Wed, Aug 21, 2019 01:55होमपेज › Satara › थकबाकीदारांच्या मिळकती सील होणार 

थकबाकीदारांच्या मिळकती सील होणार 

Published On: Mar 20 2018 1:50AM | Last Updated: Mar 19 2018 11:18PMसातारा : आदेश खताळ

मालमत्ता कर थकवणार्‍या कॉर्पोरेट मोबाईल कंपन्यांकडील बरीचशी वसुली केल्यावर सातारा पालिका प्रशासनाने मालमत्ता कर थकवणार्‍या 100 मालमत्ताधारकांची यादी तयार केली आहे. त्यामध्ये विकसकांसोबत निवासी सोसायट्या तसेच मोठ्या थकबाकीदारांचा  समावेश आहे. त्यामुळे पालिकेने अशा थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याचा पवित्रा घेतला असून संबंधितांना तसे वॉरंट काढण्यात आले आहे.

मालमत्ता कर हा पालिकेचा जकातीनंतरचा दुसरा मोठा उत्पन्‍नाचा स्रोत आहे; मात्र कॉर्पोरेट कंपन्या, विकसक, निवासी सोसायट्या तसेच मोठ्या मिळकतधारकांनी नगरपालिकेचा मालमत्ता कर थकवला आहे. काही प्रकरणे न्यायालयामध्ये अडकल्यामुळेही अशा प्रकरणातील मालमत्ता कर मोठ्या प्रमाणावर थकला आहे. यावर्षी मालमत्ता करात 31 कोटी 38 लाख 16 हजार 549 रुपयांची मागणी होती. त्यापोटी पालिकेच्या वसुली विभागाने 15 कोटी 23 लाख 94 हजार 626 रुपये वसुली केली. मात्र, विविध कारणांमुळे पालिकेचा तब्बल 16 कोटी 14 लाख 21 हजार 923 कोटींचा मालमत्ता कर थकीत राहिला.

त्यामुळे  कोणताही वाद नसलेल्या प्रकरणातील थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी वसुली विभागाने संबंधितांना नोटीस बजावण्याचे काम सुरु केले आहे. सर्वाधिक थकबाकी असलेल्या 293 जणांची यादी तयार करण्यात आली असून त्यापैकी 100 जणांना वॉरंट बजावले आहे. एका लाखापेक्षा जादा कर थकवलेल्यांचा यामध्ये समावेश आहे. यातील अनेकांनी दहा वर्षांपूर्वीपासून थकबाकी भरलेली नाही. एकेका व्यवसायिकाकडे व संस्थेकडे 50-50 लाखांची थकबाकी आहे. नगरपालिकेने अशी थकबाकी आधी वसूल करण्याचे ठरवले आहे. अशा बड्या थकबाकीदारांकडील वसुली सुरुवातीला केल्यावर सामान्य नागरिकांवर अन्याय होणार नाही. या कारवाईत  मोठ्या मिळकतदारांनाही दणका बसणार आहे. या माहिन्यात वसुली करण्यावर नगरपालिकेचा भर आहे. दहा दिवसांत सुमारे 6 कोटींहून अधिक वसुली होईल, अशी शक्यता प्रशासनातून व्यक्‍त केली जात आहे.

चिमणपुरा पेठ, सदरबझारमध्ये सर्वाधिक थकबाकी

सातार्‍यातील काही भागांची थकबाकी मोठी आहे. चिमणपुरा पेठेत 1 कोटी 97 लाख 31 हजार 42 रुपये, सदरबझारमध्ये 92 लाख 12 हजार 607 रुपये, सोमवार पेठेत 87 लाख 91 हजार 240 रुपये अशी सर्वाधिक थकबाकी आहे.  वसुलीसाठी वसुली विभागाने कारवाईची मोहीम उघडली आहे. मात्र, ही कारवाई टाळण्यासाठी नगरसेवकांचा दबाव येत आहे. बर्‍याचदा नागरिकांकडून मिळकत बिलातील निम्मीअधिक रक्‍कम भरली जाते. उरलेल्या रकमेवर पुन्हा दोन टक्के दंड दर महिना आकारला जातो.  असा भुर्दंड टाळण्यासाठी संपूर्ण थकबाकी भरण्याचे आवाहन प्रशासनाने केले  आहे.

 

Tags : satara, satara news, Satara municipality, defaulters,