Sun, Jul 21, 2019 12:31होमपेज › Satara › पालिकेत सभापती निवडीचे वारे

पालिकेत सभापती निवडीचे वारे

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 24 2017 11:13PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेत सभापती निवडीचे वारे वाहू लागले आहे. उपनगराध्यक्षपदासाठी चढाओढ निर्माण झाली आहे. पदाधिकारी निवडीच्या पार्श्‍वभूमीवर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी दुपारी 1 वाजता सातारा विकास आघाडीची बैठक एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आली असून यावेळी पदाधिकारी निवडीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

सातारा नगरपालिकेची निवडणूक होऊन नवे पार्लमेंटरी बोर्ड अस्तित्वात आल्याला नुकतेच वर्ष झाले. नगराध्यक्षांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर आठ-दहा दिवसांतच उपनगराध्यक्ष तसेच सभापती निवडी झाल्या होत्या. नगराध्यक्ष तसेच मागासवर्गीय विशेष कल्याण समिती सभापतिपद वगळता उर्वरित पदांच्या निवडी नव्या वर्षातील पहिल्याच आठवड्यात संपत आहेत. तत्पूर्वी आठ दिवस अगोदर या पदांसाठी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.                                                                                        

त्यामुळे नगरपालिकेत सभापती निवडीचे वारे वाहू लागले आहे. वर्षभरात पदावरील प्रत्येकाने आपापल्यापरीने काम करण्याचा प्रयत्न केला. नगरपालिकेच्या निवडणुकीपासूनच नोटाबंदी, जीएसटी, कामावर कंत्राटदारांनी टाकलेला बहिष्कार या बाबींना सामोरे जावे लागले. त्यामुळे  अपेक्षित विकास करता आला नाही, अशी तक्रार पदाधिकार्‍यांकडून होत आहे. त्यामुळे संबंधित पदांवर पुन्हा संधी मिळावी, असा आग्रह होऊ लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर दि. 25 रोजी खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत साविआची बैठक बोलावण्यात आली आहे.

या बैठकीतआरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम, शहर विकास नियोजन, महिला व बालकल्याण या विषय समित्यांचे सभापती तसेच उपनगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसंदर्भात चर्चा होण्याची दाट शक्यता आघाडीच्या गोटातून व्यक्‍त होत आहे. या बैठकीत शहरातील विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे. 

नव्यांना संधी मिळण्याची शक्यता

साविआचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सभापती  तसेच उपनगराध्यक्षपद देताना पहिल्या वर्षी सर्व नव्या उमेदवारांना संधी दिली. मात्र, तरीही काही जण मुदतवाढ मिळावी यासाठी आग्रही आहेत.  दोन महिन्यांपूर्वी नगरपालिकेचे बजेट मंजूर झाल्याने विकासकामांना निधी उपलब्ध होऊ लागला आहे. रखडलेली कामे मार्गी लावता यावीत, यासाठी नेत्यांकडे  गळ घातली जाण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळीही नव्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा आघाडीत आहे.