Wed, Apr 24, 2019 22:23होमपेज › Satara › सरकारी कार्यालयांनीच थकवले 78 लाख

सरकारी कार्यालयांनीच थकवले 78 लाख

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 15 2018 12:17AMसातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेची कोट्यवधींची थकबाकी वाढली आहे. सरकारी कार्यालयांनीही थकबाकी न भरता नगरपालिकेला चुना लावला आहे.  विविध शासकीय विभागांकडून 78 लाख 31 हजारांची थकबाकी असून ती उकळण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. थकबाकी वसुलीसाठी पालिकेने कारवाईचा इशारा दिला आहे.
शहरातील मिळकतींची चतुर्थ वार्षिक पाहणी झाल्याने हजारोंच्या संख्येने मिळकती वाढल्या. नगरपालिकेच्या उत्पन्‍नात वाढ झाली. मात्र, वर्षानुवर्षे कर न भरणारे काहीजण सोकावले असून त्यांच्यावर

कारवाईची मागणी होत आहे. अशा बड्यांबरोबरच थकबाकीदार शासकीय कार्यालयांची संख्याही मोठी आहे. वसुलीसाठी ग्रामपंचायतींवर कारवाई करणार्‍या जिल्हा परिषदेने 4 लाख 89 हजार 197 रुपये थकवले आहेत. देणी वसूल करण्यासाठी प्रसंगी सात-बारावर बोजा चढवण्यास मागेपुढे न पाहणार्‍या महसूल विभागाने सुमारे 9 लाख 32 हजार 538 रुपये पालिकेचा कर थकवला आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुनर्वसन विभागाची 19 हजार 573 रुपये, रोहयो कार्यालयाची 2 लाख 37 हजार 493 रुपये, सातारा तहसील कार्यालय 6 लाख 6  हजार 763 रुपये, तलाठी निवास 23 हजार 64,  तहसीलदार धान्य गोडावूनची 45 हजार 645 रुपये थकबाकी आहे. 

शासकीय कर्मचार्‍यांकडून मेंटेनन्स वसूल करूनही सुविधा  न देणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 21 लाख 20हजार 426  हजारांची थकबाकी आहे. त्यामध्ये बांधकाम भवन 70 हजार 842 रुपये, कार्यकारी अभियंता कार्यालय 18 लाख 88 हजार 24 रुपये, सर्कीट हाऊस 13 हजार 517 रुपये, डिस्ट्रीक इंजिनियर पब्लिक वर्क्स कार्यालय 15 हजार 840 रुपये,  सार्वजनिक बांधकाम पूर्व विभागाच्या विविध इमारतींची 92 हजार 549 रुपये, पश्‍चिम विभाग व गोडाऊन 10 हजार 154 रुपये थकबाकी आहे. विविध शासकीय अधिकारी रहात असलेल्या तक्षशिला तसेच नालंदा इमारतींची 40 हजार 573 रुपये  तर दळणवळण कार्यकारी अभियंता रहदारी बंगल्याची 8 हजार 401 रुपये थकबाकी आहे. 

 दंडात्मक कारवाईची तत्परता दाखवणार्‍या सातारा पोलिस विभागाकडेे सुमारे 25 लाख 32 हजार 822 इतकी थकबाकी आहे. त्यामध्ये मंगळवार पेठ, करंजे पेठ व व्यंकटपुरा पोलिस चौकी, पोलिस रिझर्व्ह क्वॉटर्स, पोलिस इन्सपेक्टर क्वॉटर्स, सातारा पोलिस स्टेशन, सिटी पोलिस स्टेशन, पोलिस लॉकअप जेल, पोलिस करमणूक केंद्र, पोलिस क्लब, अजिंक्यतारा विश्रामगृह, सातारा (मेघा टी), सातारा पोलिस वसाहत, पोलिस अधीक्षक कार्यालय व लॉकअप शेड, वायरलेस पोलिस, डीएसपी बंगला, उपविभागीय पोलिस अधिकारी बंगला  यांचा समावेश आहे.

पाणीपट्टी थकबाकीसाठी शेतकर्‍यांवर कारवाई करणार्‍या सातारा उपविभागीय पाटबंधारे कार्यालयाचे 66 हजार 95 रुपये थकले आहेत.  वन विभाग 1 लाख 12 हजार 73 रुपये, जिल्हा सत्र न्यायालय 1 लाख 99 हजार 169 रुपये, भारत संचार निगम लि. 1 लाख 14 हजार 147 रुपये,  सहा. निबंधक मुद्रांक अधिकारी कार्यालय 2 लाख 18 हजार 127 रुपये, पोस्ट कार्यालय 4 लाख 12 हजार 612 रुपये, आरटीओ कार्यालय 3 हजार 464 रुपये,  सिव्हल सर्जन मलेरिया ऑफिस 1 लाख 14 हजार 794 रुपये, मुकबधीर विद्यालय, समाता शिक्षण प्रसारक संस्थेचे 3 लाख 56 हजार 883 रुपये, प्रतापसिंह हायस्कूल 21  हजार 112, मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह  73 हजार 619 रुपये,  जिल्हा कोषागार कार्यालय 15 हजार 294 रुपयांची थकबाकी आहे.
सरकारी विभागांचा दिव्याखाली अंधार

जिल्हा प्रशासनात कारभाराचा आदर्श असलेल्या बहुतेक विभागांच्याच बुडाखाली अंधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. थकबाकी असणार्‍या विभागांकडूनच कर थकवला जात असताना सर्वसामान्यांपाठिमागे मात्र कारवाईचा ससेमिरा लावला जातो. सातारा प लिकेला उत्पन्नाची साधने कमी असताना प्रशासनातील मलईदार विभाग मात्र कोट्यवधींची थकबाकी ठेवतात, याचेच सामान्यांना आश्‍चर्य आहे. सरकारी विभागांनी पालिकेची थकबाकी भरावी, अशी मागणी होत आहे.