Sat, Mar 23, 2019 12:08होमपेज › Satara › पालिकेत भाजप नगरसेवकांत ‘गोळ्या घालण्याची भाषा’

पालिकेत भाजप नगरसेवकांत ‘गोळ्या घालण्याची भाषा’

Published On: Apr 18 2018 12:56AM | Last Updated: Apr 17 2018 11:03PMसातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेत भाजपमधील गटबाजी मंगळवारी उफाळून आली असून हमरीतुमरीपासून सुरू झालेली बाचाबाची गोळ्या घालण्याच्या धमकीपर्यंत गेल्याने भाजप गोटात खळबळ उडाली. भाजपचे गटनेते धनंजय जांभळे व नगरसेवक विजय काटवटे यांच्यातील वादादरम्यान हा प्रकार घडला.  

सातारा नगरपालिकेत मंगळवारी निवडणूक शाखेत धनंजय जांभळे आणि विजय काटवटे बसलेले होते. त्यावेळी शासनाकडून आलेला निधी आणि सातारा नगरपालिकेतील निधी वाटपावरून दोघांमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी विजय काटवटे यांनी सर्व नगरसेवकांना समान निधी द्या, भेदभाव करू नका, अशी विनंती जांभळे यांना केली. त्यावर मी गटनेता आहे. जे काही ठरवायचे ते मी ठरवेन. कोणी मला सांगायचे नाही, अशी भाषा जांभळे यांनी वापरल्याचे सांगण्यात येते. याचवेळी गोळ्या घालण्याची भाषा झाली. 

सातारा पालिकेत झालेला दमबाजीचा प्रकार  मी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातला आहे. त्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे नगरसेवक विजय काटवटे यांनी सांगितले. तर जांभळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, भाजपचे सर्व नगरसेवक चर्चेसाठी बसलो होतो. माझ्या प्रभागातील विकासकामांचे विषय मंजूर असल्याने या पुढे येणारा निधी मला देऊ नका असे सांगितले. आमच्यात झालेले भांडण मिटले आहे. आमच्यातील वाद बाहेर पडला याचेच आश्‍चर्य वाटते.

 

Tags : satara, satara news. Satara municipal, BJP dispute,