Thu, Aug 22, 2019 12:29होमपेज › Satara › पंतप्रधानांच्या शिष्टमंडळात जिल्ह्यातील प्रतिनिधींचा समावेश करू : मुख्यमंत्री

पंतप्रधानांच्या शिष्टमंडळात जिल्ह्यातील प्रतिनिधींचा समावेश करू : मुख्यमंत्री

Published On: Mar 03 2018 1:43AM | Last Updated: Mar 02 2018 11:07PMसातारा : प्रतिनिधी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. हा प्रश्‍न ऐरणीवर आणण्यासाठी सातारा जिल्ह्याने चळवळ उभी केली आहे, त्यामुळे त्या शिष्टमंडळात सातारा जिल्हयातील साहित्यिक प्रतिनिधींचा समावेश करावा, अशी मागणी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळात जिल्हयातील साहित्यिक प्रतिनिधींचा समावेश करु, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

बडोदे येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच भेटेल, असे जाहीर केले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर शिष्टमंडळ भेटणार असल्याचे प्रसिध्द झाले होते. तथापि हा प्रश्‍न ऐरणीवर आणण्यासाठी सातारा जिल्हयाने पुढाकार घेतला आहे. मराठी भाषेचा अभिजात दर्जाचा चार वर्षे धूळ खात पडलेला प्रस्ताव कॅबिनेटपर्यंत नेण्यासाठी जिल्हयातील साहित्यिक प्रतिनिधींनी वारंवार निवेदने, पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार, दिल्लीत आंदोलन केले आहे.

त्यामुळे राज्य सरकारच्या शिष्टमंडळात जिल्हयातील साहित्यिक प्रतिनिधींचा समावेश करावा, अशी मागणी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळात जिल्ह्यातील साहित्यिक प्रतिनिधींचा समावेश करु तसेच लवकरच शिष्टमंडळ पंतप्रधानांची  भेट घेण्यासाठी जाईल, अशी ग्वाही दिली. या चर्चेवेळी मसाप जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी, कविवर्य बा.सी.मर्ढेकर स्मारक समिती सदस्य व सातारा जिल्हा पत्रकार संघाचे  अध्यक्ष हरिष पाटणे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, पालिका भाजप गटनेते धनंजय जांभळे, नगरसेवक विजय काटवटे, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, अ‍ॅड. विक्रम पवार, फिरोज पठाण उपस्थित होते.