Fri, Jul 19, 2019 20:31होमपेज › Satara › ॐ नम: शिवाय; आज जयघोष

ॐ नम: शिवाय; आज जयघोष

Published On: Feb 13 2018 2:00AM | Last Updated: Feb 12 2018 9:01PMसातारा : प्रतिनिधी

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून आज मंगळवारी जिल्ह्यात सर्वत्र महाशिवरात्री विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ठिकठिकाणच्या शिव मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली असून आज सर्वत्र ‘हर हर महादेव’, ‘ओम नम: शिवाय’चा जयघोष कानी पडणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त महारूद्र अभिषेक, होमहवन, महाप्रसाद, भजन, कीर्तन, प्रवचन आदी  धार्मिक कार्यक्रमांचे सर्वत्र आयोजन करण्यात आले आहे.  दरम्यान, सोमवारीही सर्वत्र शिवमय वातावरण पहायला मिळाले. ठिकठिकाणच्या शिवमंदिरात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. 

 महाशिवरात्री म्हणजे भाविकांच्या अपार श्रद्धेचा विषय. मंगळवारी होत असलेल्या महाशिवरात्रीसाठी पूर्वसंध्येला अवघे जनजीवन उद्याच्या उत्सवासाठी आतुरले होते. ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये फुलांची आकर्षक सजावट, रांगोळ्या, विद्युत रोषणाई याद्वारे महाशिवरात्रीची जय्यत तयारी सुरू होती. आज या शिवमंदिरामध्ये भाविकांचा उदंड उत्साह पहायला मिळणार आहे. सकाळपासूनच शिवमंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसणार आहे.  अनेक शिवमंदिरांना तर यात्रेचे स्वरूप येणार आहे. 

शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिर, यवतेश्‍वर, सातारा शहरातील कोटेश्‍वर मंदिर, माहुली येथील काशीविश्‍वेश्‍वर मंदिर, नटराज मंदिरातील मूलनाथेश्‍वर, लिंब गोवे येथील कोटेश्‍वर, देगाव येथील पाटेश्‍वर, क्षेत्र महाबळेश्‍वर, कुरोली येथील सिद्धेश्‍वर मंदिर, कोरेगाव येथील केदारेश्‍वर, तांदुळवाडी येथील कोल्हेश्‍वर, गुरसाळे येथील भावलिंग देवस्थान, वाई येथील मेणवलेश्‍वर व अमृतेश्‍वर मंदिर, वडूज येथील तारेकश्‍वर मंदिर, आगाशिवनगर येथील डोंगरावरील शंकराचे मंदिर,  किसनवीर कारखाना येथील चंद्र मौलेश्‍वर , साप येथील महादेव  मंदीर  ब्रह्मपुरी यासह विविध  ठिकाणच्या  श्री शंकराच्या मंदिरात आज विविध कार्यक्रम होत आहे. 

येवतेश्‍वर येथील महादेवाच्या मंदिरात पहाटे 4 वाजल्यापासून  धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. महाआरती, रघुरुद्र व  देवाचा छबिना काढण्यात येणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरातील गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आला होता.  

वाई तालुक्यात महाशिवरात्रीनिमित्त भद्रेश्‍वर, काशिविश्‍वेश्‍वर, सिद्धेश्‍वर, वाकेश्‍वर, हरिहरेश्‍वर मंदिरांत होमहवन,भजन, कीर्तन व महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यात येणार आहे.  यावेळी खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. 

क्षेत्र महाबळेश्‍वरलाही आज यात्रेचे स्वरूप येणार आहे. भाविकांचे हे श्रद्धास्थान असून मैलोन मैल पायपीट करूनही भाविक येथे दर्शनाला आवर्जून येत असतात. क्षेत्रमहाबळेश्‍वर येथील प्रसिद्ध महादेव मंदिरात हजारो भाविकांसह पर्यटकही हजेरी लावतात. आज क्षेत्र महाबळेश्‍वरच्या या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्‍न होत आहेत.  

दुर्गम व डोंगराळ भाग असलेल्या पर्वत तर्फ वाघावळे येथील श्री क्षेत्र जोम मल्लिकार्जुन मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डोंगरी भागातील तमाम भाविकांचे हे श्रद्धास्थान असून येथे महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविक हजर राहत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सीताराम जंगम यांनी दिली.


घरोघरी उपवासाची तयारी

 महाशिवरात्रीसाठी घरोघरीही अपार उत्साह दिसून आला. घरोघरी महाशिवरात्रीच्या फराळाची तयारी दिसून आली. बाजारपेठेतही फराळाचे पदार्थ आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले आहेत. त्याच्या खरेदीकडे भाविक व नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात राहिला. याशिवाय शिवमंदिरामधील महाप्रसादासाठीही संयोजकांची धावपळ सुरू असल्याचे ठिकठिकाणी दिसून आले. शिवमंदिराच्या परिसरात मंडप टाकून महाशिवरात्रीची तयारी सुरू असल्याचे चित्र रविवारी दिसून आले. 

लिंब गोवेच्या कोटेश्‍वर मंदिरात आज यात्रा
 
सातारा जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील लाखो शिवभक्‍तांचे श्रद्धास्थान असलेल्या शंकराचे स्वयंभू  स्थान असलेल्या लिंब - गोवे, ता. सातारा येथे श्री कोटेश्‍वर मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्‍त मोठ्या संख्येने हजेरी  लावतात. महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिरात सायंकाळी श्री कृष्णाबाई उत्सव मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे.  भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

सिद्धनाथ मंदिरात आज भक्‍तीचा जागर

महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, विदर्भ, मराठवाडा आदी राज्यांतील अनेकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ  मंदिरातील भुयारात असलेले स्वयंभू शिवलिंग मंगळवार, दि. 13 रोजी महाशिवरात्रीदिवशी भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार असल्याची माहिती सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टकडून देण्यात आली. शिवाचे रक्षणकर्ते व शिवअवतार स्वरुप म्हणून काळभैरव म्हणजेच श्री सिद्धनाथ व त्यांची पत्नी जोगेश्‍वरी  मंदिरातील गाभार्‍यात भुयाराच्यावर असलेल्या सिंहासनावर आरुढ झाले, अशी आख्यायिका आहे. याठिकाणी असलेले शिवलिंग वर्षातून एकवेळ म्हणजे फक्‍त महाशिवरात्रीच्या रात्री भाविकांच्या दर्शनाभासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येते.

ती रात्र संपल्यानंतर भुयार बंद केले जाते. ते वर्षभर बंद असते. महाशिवरात्रीच्या रात्री 10 वाजता या भुयाराचे प्रवेशद्वार उघडले जाते. सुरुवातीस 15ते 20 मिनिटे हवा जाण्यासाठी शिवलिंग खुले ठेवून साफसफाई करण्यात येते. त्यानंतर स्वयंभू शिवलिंगास पंचामृताने अभिषेक करुन दहिभाताची पूजा बांधली जाते. हा सर्व विधी श्री सिद्धनाथाचे मुख्य पुजारी  सालकरी यांच्या हस्ते केला जातो. काही वेळानंतर शिवलिंगाची दही - भात पूजा उतरवून शिवलिंग भाविकांच्या दर्शनासाठी खुले केले जाते.  भुयारात जाताना एकाच व्यक्‍तीला जाता येईल असा एक ते दीड फूट रुंदीचा रस्ता असल्याने एकावेळी आठ ते दहा भाविकांना आत सोडले जाते. ते भाविक दर्शन घेऊन परतल्यानंतर दुसर्‍यांना परवानगी दिली जाते. 

या स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दरवर्षी महाशिवरात्रीला या मंदिरात गर्दी करतात. यावेळी येथे एक छोटी यात्राच भरत असते. मंदिरातील दर्शन रांगेतून रात्री दहापासून पहाटे चार ते साडेचार वाजेपर्यंत हजारो भाविक या स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतात. वर्षभर बंद असलेले हे भुयार फक्‍त महाशिवरात्रीच्या रात्री रात्रभर स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात  येते.

संगम माहुली

सातारा : प्रतिनिधी ः श्रीक्षेत्र संगम माहुली येथील  काशीविश्‍वेश्‍वर मंदिरामध्ये  रात्री 12 वाजता अभिषेक करण्यात येणार आहे. यानंतर महाआरती, सकाळी 8 वाजल्यापासूनच महाप्रसादाचे वाटप आदी कार्यक्रम होणार आहेत. मंदिराच्या गाभार्‍यामध्ये सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या असून पताका, झेंडे यांनी परिसर सुशोभित करण्यात आला आहे. 

सिद्धेश्‍वर मंदिर, मेढा

केळघर : वार्ताहर महाशिवरात्रीनिमित्त मेढा येथील सिद्धेश्‍वर मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. 7 रोजी पहाटे सहा ते नऊ या वेळेत श्री महादेवाचा  द्राभिषेक होणार आहे. ओम श्री पंचाक्षर माहेश्‍वर (जंगम) पौरोहित्य मंडळाच्या वतीने हा रूद्राभिषेक होणार आहे.सकाळी दहा ते एक या वेळेत सूरसंगम ग्रुप, मेढा यांचा भक्‍तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे.चार ते सात या वेळेत राधिका भजन मंडळाच्या भजनांचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून महाप्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ भाविक-भक्‍तांनी घ्यावा, असे आवाहन वीरशैव लिंगायत वाणी समाज व ग्रामस्थ, मंडळ मेढा यांनी केले आहे.


नागठाणे : वार्ताहर

नागठाणे (ता. सातारा) येथे  गावच्या पश्‍चिमेला पुरातन महादेव मंदिर आहे. हे शिवमंदिर दोन्ही ओढ्यांच्या संगमावर वसलेले असून या मंदिराला संगमेश्‍वराचे मंदिर असे संबोधले जाते. मंदिरात पहाटे शिवलिंगाची विधीवत पूजाअर्चा, सकाळी 9 ते 12 भजनाचा कार्यक्रम होणार आहे. महाशिवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी ग्रामस्थांच्या सहभागातून महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या दिवशी सायंकाळी 7 वा. ग्रामदैवत चौंडेश्‍वरी देवीची पालखी संगमेश्‍वराच्या भेटीला येणार आहे.


विडणी : वार्ताहर

उत्तरेश्‍वर उत्सव समितीच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त विडणी येथील पांडवकालीन उत्तरेश्‍वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  मंगळवार दि.13 रोजी सकाळी 7 वाजता श्रींची आरती, सकाळी 11 ते 4 पर्यंत गावठाण व पंचक्रोशीतील विविध भजनी 9 मंडळाचा हरिनाम जागर होणार आहे. सायंकाळी 7 वाजता श्रींची आरती होणार आहे. रात्री 9 वाजता  कु.  रुक्मिणी महाराज आळंदीकर यांचे कीर्तन, सायंकाळी 12.5 वाजता उत्तरेश्‍वर मंदीरात लघुरुद्रा अभिषेक करुन बेल व पुष्पवृष्टी, सायंकाळी 1 ते 2.30 वाजता होम हवन आहे. दि. 14 रोजी सकाळी 8.30 वाजता शिवलीला पारायण समाप्‍ती व महाप्रसाद दिला जाणार आहे. भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे उत्तरेश्‍वर उत्सव समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.


महाबळेश्‍वर : वार्ताहर 

स्वयंभू श्री खतेश्‍वर शिवशंकर, आई जननी कुंबळजाई हे देवालय हे निसर्गाने नटलेल्या पारूट या गावी आहेे. मांघर, घोड़े पारुट, पारुट, चिखली, देवळी, देवसरे, झांजवड, चतुरबेट, मजरेवाडी, कुमठे, बामणोली, दाभेदाभेकर, उंबरी (बामणोली), धावली, तायघाट या गावचे हे ग्रामदैवत आहे. या गावातील ग्रामस्थ महाराष्ट्रात विखुरले आहेत. मात्र, महाशिवरात्रौत्सव  पौर्णिमेला देवीचा गोंधळ, होळी धूलिवंदन श्रावणी सोमवार, कार्तिक महिन्यातील बारस उत्सव मे महिन्यात होणारा वर्धापनदिन या सर्व कार्यक्रमांना हेच ग्रामस्थ हजेरी लावतात. भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी अनेक अडचणी येत असून या सोडविण्यासाठी ट्रस्ट व ग्रामपंचायत प्रयत्नशील आहेत.यावर्षी देखील महाशिवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात धार्मिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.


कोडोली : वार्ताहर 

संभाजीनगर (ता. सातारा) येथील बारावकरनगर येथील श्रीदेव हरी हरेश्‍वर शिवमंदिरात महाशिवरात्री उत्सव दोन दिवस साजरा करण्यात येत असून शिवभक्‍तांंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे.  मंगळवार दि. 13 फेबु्रवारी रोजी श्रींचा रुद्राभिषेक सायंकाळी 4 ते 6 यावेळेत पालखी मिरवणूक सोहळा रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि. 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 7 या वेळेत महाप्रसादाचे वाटप सायंकाळी 7 ते 10 या वेळेत भजन व भारुडाचा कार्यक्रम होणार आहे, तरी संभाजीनगर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.  दरम्यान, सातारा शहरातील कमानी हौद, कोठेश्‍वर मंदिर, क्षेत्र माहुली,  कुरणेश्‍वर आदी शिवमंदिरात सोमवारीही भाविकांची लगबग सुरू होती. अनेक ठिकाणी शिवमंदिरात सजावटीचे काम सुरू असल्याचे चित्र दिसत होते.