Mon, Jun 17, 2019 18:39



होमपेज › Satara › अंतराच्या दाखल्यासाठी गुरुजी एसटीत महामंडळ ठरवणार

अंतराच्या दाखल्यासाठी गुरुजी एसटीत महामंडळ ठरवणार

Published On: Feb 06 2018 1:49AM | Last Updated: Feb 05 2018 9:48PM



सातारा : प्रतिनिधी

राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशानंतर शिक्षकांच्या बदल्यांचे प्रकरण गतवर्षी चांगलेच चर्चेत आले होते. त्या बदल्यांची नव्याने कार्यवाही सुरू झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील हजारो प्राथमिक शिक्षक बदलीग्रस्त आहेत. पती- पत्नी एकत्रीकरणासाठी एस.टीकडून अंतराचा दाखला घेण्याचा फतवा शासनाकडून काढण्यात येणार असल्याचे समजल्यानंतर हा फतवा निघण्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागीय कार्यालयात दाखला मिळवण्यासाठी शिक्षकांचे हेलपाटे सुरू झाले आहेत. त्यामुळे आता एस.टीच शिक्षक पती-पत्नीचे एकत्रीकरण ठरवणार आहे. अंतराचा दाखला ज्यांना हवा आहे त्या शिक्षकांची एकत्रित यादी तयार करण्याच्या सूचना एस. टीच्या अधिकार्‍यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांना दिल्या आहेत. आलेल्या यादीची तपासणी करून प्रत्येक  शिक्षकांच्या अंतराच्या दाखल्याचा अहवाल एसटीकडून गटशिक्षणाधिकार्‍यांकडे सादर केला जाणार आहे. शिक्षक पती-पत्नी एकत्रिकरणासाठी अशा शिक्षकांच्या एस.टी मार्गाचे अंतर ग्राह्य धरावे  लागते.

त्यासाठी प्राथमिक शिक्षकांनी आतापासूनच अंतराचे दाखले मिळण्यासाठी एस.टीच्या विभागीय कार्यालयात गर्दी केली आहे. एस.टीच्या विभागीय कार्यालयात अनेक शिक्षकांनी शाळा सोडून हा दाखला मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आगारातील अधिकार्‍यांच्या गाठीभेटीवर शिक्षकांनी जोर दिला आहे. मात्र, अधिकार्‍यांनीही प्रत्येकाला स्वतंत्र असा दाखला देण्यात येणार नसल्याची भूमिका घेतली आहे. सर्व शिक्षकांची एकत्रित यादी तयार करण्यात येणार आहे. महामंडळाच्या मान्यतेनुसार किती अंतर भरते त्याप्रमाणेच संबंधित शिक्षकांची अंतराची 

माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभाग व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्‍यांकडे देण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही करताना दिसत आहे. त्यानुसार बदलीपात्र शिक्षकांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांची संच मान्यता झालेली नाही. ऑनलाईन संच मान्यता पूर्ण झाल्यावर बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. 
नव्या फतव्यामुळे सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्‍वर, कोरेगाव, वडूज, दहिवडी, फलटण, पारगाव, खंडाळा, मेढा या 11 आगार कार्यालयात अंतराच्या दाखल्यासाठी शिक्षकांचे हेलपाटे सुरू झाले आहेत.