Thu, Jun 27, 2019 11:41होमपेज › Satara › जंगलातील हानी टाळण्यासाठी आता फायर लाईन

जंगलातील हानी टाळण्यासाठी आता फायर लाईन

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 15 2018 7:34PMसातारा : प्रवीण शिंगटे 

सातारा जिल्ह्यात नोव्हेंबर ते मे महिन्याच्या कालावधीत अनेक  ठिकाणी वणवे लावण्याचे प्रकार घडत असतात. त्यामध्ये जैवविविधतेची मोठ्या प्रमाणात हानी होते. हे टाळण्यासाठी वनविभागाने नोव्हेंबर महिन्यापासूनच वनक्षेत्राला लागून असलेल्या जागेवर फायर लाईन (जाळ रेषा ) टाकण्याचे काम सुरू केले आहे. हे काम प्रगतीपथावर  असल्याचे वनविभागामार्फत सांगण्यात आले. सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्‍वर, जावली, खंडाळा, कोरेगाव, फलटण, खटाव, माण अशा 11 तालुक्यात  सुमारे 1 लाख 18 हजार 174.62 हेक्टर वनक्षेत्र आहे. त्यामुळे या वनक्षेत्रात दरवर्षी वणवे लागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत.

यासाठी वनविभागामार्फत विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. वनविभागाने सर्वत्र नोव्हेंबरपासून वनरक्षक व कर्मचारी, संयुक्त वनव्यवस्थापन समित्यामार्फत वनक्षेत्राला लागून असलेले जुने प्लँन्टेशन, पायवाट, वनक्षेत्रात जाणारे मुख्य रस्ते या ठिकाणी (फायर लाईन) जाळ रेषा टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम प्रगतीपथावर असल्याने वन क्षेत्रात वणवा लागला तर तो पूर्ण वणवा वनक्षेत्रात पसरणार नाही, याची काळजी वनविभागासह सातारा 94, महाबळेश्‍वर 93, कराड 76, ढेबेवाडी 51, पाटण 120, फलटण 75, दहिवडी 70, वडूज 61, कोरेगाव 501, मेढा 75, वाई 61, खंडाळा 50 अशा सुमारे 825 संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांनी घेतली आहे. 

दरम्यान, वनक्षेत्रालगत असणार्‍या जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामस्थांच्या वनविभागामार्फत बैठका  घेण्यात आल्या तर काही ठिकाणी कागदोपत्रीच बैठका घेतल्या असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत वनाचे संरक्षण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वनातील दुर्मीळ जैवविविधता व वन औषधांचे जतन करणे गरजेचे  आहे. यासाठी वणवा न लावण्याच्या सूचनाही अधिकार्‍यांनी ग्रामस्थांना बैठकीद्वारे दिल्या, मात्र सूचना देवूनही वनालगत असणार्‍या नागरिकांची  मानसिकता अद्यापही तशी दिसून येत नाही.