Tue, Nov 13, 2018 04:22होमपेज › Satara › बिबट्याचा माची पेठेत शिरकाव

बिबट्याचा माची पेठेत शिरकाव

Published On: Mar 25 2018 1:53AM | Last Updated: Mar 25 2018 12:17AMसातारा : प्रतिनिधी

अजिंक्यतारा किल्ल्यावरील  बिबट्याचा वावर आता शहरालगतच्या नागरी वस्ती व कॉलन्यांमध्ये आढळून येऊ लागल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास माची पेठेत तर शनिवारी सायंकाळी पुन्हा अजिंक्यतारा स्मृती वन परिसरात अचानक बिबट्या प्रकटला. त्यामुळे घाबरगुंडी उडालेल्या नागरिकांनी अख्खी रात्र जागून काढली. अजिंक्यतार्‍यालगत असलेल्या  निसर्ग कॉलनी, रामराव पवार नगर, गोळीबार मैदान परिसरात गेल्या काही दिवसांपासून दोन बिबट्यांचा वावर वाढला आहे. हे बिबटे नागरिकांना दिवसाही दिसू लागले आहेत. गुरुवारी चारभिंती ते अजिंक्यतारा स्मृती वनालगत असलेल्या महादेव मंदिर परिसरातील दाट झाडीत बिबट्या दबा धरून बसला होता.

शुक्रवारी रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास बिबट्याने माची  पेठेत काही नागरिकांना अचानक दर्शन दिले. त्यामुळे नागरिकांची   धडधड वाढली. नागरिकांनी आपल्या घराचे दरवाजे व खिडक्या बंद करून घेतल्या. याबाबतची माहिती नागरिकांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांना दिली. वनक्षेत्रपाल महेश पाटील व कर्मचार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांना सूचना दिल्या. मध्यरात्रीच्या सुमारास या बिबट्याला  वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले.

याबाबत महेश पाटील म्हणाले,  अजिंक्यतार्‍यावर बिबट्याचा वावर आहे. मात्र, बिबट्याच्या आईने त्याला सोडून दिले असल्याने ते या परिसरात भटकत आहेत. नागरिकांनी घाबरून जावू नये. कोठेही बिबट्याचे दर्शन झाल्यास व माहिती मिळाल्यास  तात्काळ वनविभागाशी  संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
 

 

tags : Satara,news, leopard in the forest invincible memory