Sat, May 30, 2020 12:14होमपेज › Satara › नव्या वर्षात लँड माफिया ‘रडार’वर

नव्या वर्षात लँड माफिया ‘रडार’वर

Published On: Jan 01 2018 2:09AM | Last Updated: Dec 31 2017 9:40PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात 2017 मध्ये गुंडगिरी, सावकारी, हुल्लडबाजांना मोक्का, तडीपारीचा चाप लावून प्रभावीपणे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली. नूतन वर्षातही सावकारी, गुन्हेगारी मोडीत काढून औद्योगिक सुरक्षेसह जमीन (लँड) माफिया ‘रडार’वर असल्याचा इशारा  पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला. दरम्यान, अवैध धंद्याविरुद्ध पोलिसांनी अशाच पद्धतीने तीव्र कारवाई सुरू ठेवाव्यात, अशी मागणी सर्वसामान्य सातारकरांमधून व्यक्त होत आहे.

सातारा जिल्हा पोलिस दलाची 2017 मधील पोलिसिंगची भूमिका धडाकेबाज राहिली आहे. पोलिसांच्या या कामगिरीची माहिती संदीप पाटील यांनी दिली आहे. शहरातील खंड्या धाराशिवकर याच्यापासून सावकारीविरुद्ध मोहिमेला सुरुवात केल्यानंतर वर्षभरात 46 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये फलटण, कराड शहरांमधील कारवायांचाही सहभाग असून सावकारी कारवाई हे पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे. एमपीडीए अंतर्गतही एकूण 9 प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले आहेत. 

वर्षभरात 47 जणांना तडीपार करण्यात आले असून आणखी 97 जणांविरुध्द तडीपारीचे प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, औद्योगिक सुरक्षिततेलाही पोलिसांनी प्राधान्य दिले असून 24 तास पोलिस गस्तीसाठी पथके तैनात करण्यात आल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले. याबाबतच्या पत्रकात पुढे म्हटले आहे, वर्षभरात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जुगाराचे एकूण 685 गुन्हे दाखल करुन 944 आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये 63 लाख 28 हजार 389 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दारुप्रकरणी रेकॉर्डबे्रक कारवाई झाली असून 1639 कारवाईमध्ये 2 कोटी 8 लाख 99 हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पोलिसांची एकीकडे धडाकेबाज कारवाई करत असताना दुसरीकडे पर्यटन पोलिस, नवीन पोलिस ठाणी, सायबर पोलिस ठाणे, फॉरेन्सिक व्हॅन, वास्तूप्रकल्प असे अभिनव उपक्रही पोलिसांनी राबवले आहेत. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी 2018 मध्येही पोलिसांच्या कारवाईचा धडाका राबवणार असल्याचा मानस व्यक्त केला आहे. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आरोपींना शिक्षा लागण्यासाठी दोषसिध्दीचे प्रमाण वाढवण्याचा संकल्प केला आहे. याशिवाय जिल्ह्यामध्ये लॅन्ड माफिया बोकाळल्याने त्यावर अंकुश ठेवणे.

दरम्यान, दलामध्ये काम करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांसाठी 700 घरांची वसाहत यासाठी विशेष प्रयत्न करुन त्याच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली जाणार आहे. पोलिसांच्या मुलांसाठी सीबीएसई इंग्रजी शाळा गोळीबार मैदान येथे उभारणीसाठी प्रयत्न सुरु असून ते पूर्णत्वास नेण्याचा संकल्प पत्रकात करण्यात आला आहे.