Tue, Mar 26, 2019 21:56



होमपेज › Satara › क्रांती ठरली ब्ल्यू फिल्मची ‘शिकार’

क्रांती ठरली ब्ल्यू फिल्मची ‘शिकार’

Published On: Mar 25 2018 1:53AM | Last Updated: Mar 24 2018 11:55PM



सातारा : विठ्ठल हेंद्रे

नेर येथील शाळकरी मुलगी क्रांतीचा मारेकरी तिचाच नातेवाईक अल्पवयीन मुलगा असल्याचे समोर आले असून तो मोबाईलवर ब्ल्यू फिल्म बघत होता. या ब्ल्यू फिल्ममधून संशयितामध्ये सैतान शिरला व क्रांती त्याची बळी ठरली. दरम्यान, क्रांतीचा शोध घेण्यासाठी या संशयित अल्पवयीन मुलासह त्याला मदत करणार्‍या महिलेनेही गावकर्‍यांसोबत सहभाग घेतला होता. दि. 21 रोजी दुपारी नेर येथील अल्पवयीन मुलगी क्रांती बेपत्ता झाल्यानंतर शिर्के कुटुंबिय हवालदिल झाले होते. बुधवारी रात्रभर तिचा शोध घेतल्यानंतर गुरुवारी पुन्हा दिवसा व रात्री कुटुंबिय, पोलिस व गावकरी क्रांतीचा शोध घेत होते. पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर तो कमालीचा चतुर असल्याचे समोर येवू लागले.

पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना तो वेगवेगळ्या माहिती देत होता. पोलिस त्याची प्रत्येक गोष्ट ऐकून पडताळणी करत होते. संबंधित मुलाबाबत पोलिसांनी अधिक माहिती काढल्यानंतर त्याने यापूर्वी चोरीचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले. यामुळे पोलिसांना त्याच्यावरील संशय बळावला. संशयित मुलगा मात्र गुरुवारी व शुक्रवारी पोलिसांना या बोटावरचे त्या बोटावरुन करुन नवीन स्टोर्‍या सांगत होता. अल्पवयीन मुलाची सर्व माहिती त्याच्या मित्रांकडून घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला बोलते केले. अखेर संशयिताने घटना घडल्यापासूनची माहिती सांगितल्यानंतर पोलिसही हादरुन गेले.
संशयित मुलाने पोलिसांना दिलेली माहिती अशी, घटनेदिवशी संशयिताने क्रांतीला पैसे देतो, असे सांगून घरासमोरून नेले. गावातच एक बांधकाम सुरु असून तिकडे फारसे कोणी फिरकत नाही. याचठिकाणी संशयिताने क्रांतीला नेले.

आडोशाला नेल्यानंतर संशयिताने मुलीवर अत्याचार केला. या घटनेने क्रांती रडू लागली व याबाबतची माहिती घरी सांगणार असल्याचे तिने सांगितले. क्रांती घरी सांगणार असल्याने संशयित घाबरला व त्याने तिचे तोंड दाबून तिला बांधून तेथे ठेवले. या घटनेनंतर तो चालत पुढे आला व हात धुवून तेथून तसाच घरी गेला. घरी गेल्यानंतर सर्वजण क्रांतीला शोधत असल्याने तोही शोध मोहिमेत सहभागी झाला. रात्री झोपी गेल्यानंतर तो सकाळी उठला व आवरुन पुन्हा क्रांतीला ज्या ठिकाणी टाकले आहे तेथे गेला. क्रांतीला पाहिल्यानंतर ती निपचीत पडली असल्याचे लक्षात लक्षात आले. तो तेथून तसाच परत शाळेमध्ये गेला. शाळा सुटल्यानंतर तो थेट रानात गेला व तेथे घडलेल्या घटनेबाबत त्याच्या आईला  सांगितले.

गुरुवारी रात्री संशयित दोघांनी क्रांतीला पाहिल्यानंतर ती निपचीत असल्याने तिला तेथून उचलले व गावातील विहरीत टाकून दिले. दोघेही घरी आल्यानंतर क्रांतीचा शोध घेण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असल्याने त्यांनीही क्रांतीला शोध घेतल्याचा बनाव केला. संशयीताच्या पापावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न त्याच्या आईने केला असला तरी निष्पाप चिमुरडी हीसुद्धा कुणाचं तरी लेकरू होतं. प्राण डोळ्यात आणून क्रांतीचा शोध घेणार्‍या तिची आई आणि कुटंबीयांची केवीलवाणी धडपड निगरगट्टपणे पाहताना संशयीतेमधील आई जागी झाली नाही.

शुक्रवारी सकाळी क्रांतीचा मृतदेह आढळल्यानंतर हे दोघे संशयित घटनास्थळी परिसरात घुटमळत होते. अखेर पोलिस तपासामध्ये संशयित अल्पवयीन मुलगा बोलता झाल्यानंतर त्याच्या आईने सहकार्य केल्याचेही समोर आले. पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर संशयिताला मदत केल्याची कबुली तिने दिली. हा सर्व घटनाक्रम ऐकल्यानंतर पोलिसांच्याही अंगावर शहारे आले. पोलिसांनी संशयिताकडे अधिक चौकशी केली असता संशयित मुलगा हा मोबाईलमध्ये ब्ल्यू फिल्म पाहत होता. यामुळेच त्याच्या भावना चाळवल्या जात होत्या. सतत ब्ल्यू फिल्म पाहत असल्याने त्याने क्रांतीबाबत आकर्षण झाले होते. यातूनच त्याच्याकडून पुढील दुष्कृत्य घडले आहे.

एसपीसंदीप पाटील पुसेगावला होते तळ ठोकून..

क्रांती बेपत्ता झाल्यानंतर ती 24 तासानंतरही सापडली नसल्याने स्वत:पोलिस अधीक्षक संदीप पाटील हे सुरुवातीला तपासासंबंधी सूचना करत होते. क्रांतीचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळल्याने त्यांनी तत्काळ घटनास्थळी व पुसेगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. नेरच्या घटनेबाबत सोशल मिडीयावर उलटसुलट चर्चा सुरु असल्याने हे प्रकरण गंभीर बनले होते. पोलिस अधीक्षक शुक्रवारी दुपारी पुसेगावला गेल्यानंतर रात्री उशीरापर्यंत ते तेथेच होते. घटनेबाबत कोणतीही कसुर, उणीव राहू नये यासाठी फॉरेन्सिकचे पथकही त्यांनी मागवून घेतले होते.

अल्पवयीन मुलाचे मोठे कारनामे..

पोलिस तपासामध्ये संशयित अल्पवयीन मुलगा हा कमालीचा शातीर असल्याचे समोर आले आहे. संशयित मुलाचे पोलिसांनी रेकॉर्ड पाहिले असता त्याच्यावर चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय क्रांतीला मारण्यापूर्वी त्याने खेळत असताना अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नही केला होता. संशयिताला वडील नाहीत. मित्रांचा मोबाईल तो वापरत होता व त्याद्वारे अश्‍लील व्हिडीओ क्‍लीप पाहत असल्याचे तपासात समोर आले आहे.
 

 

 

tags : Satara,Satara,news, kranti Shirke murder