होमपेज › Satara › कोयना धरणात 84 टीएमसी पाणी

सातारा : कोयनेचे दरवाजे पाच फुटांवर स्थिर   

Published On: Jul 22 2018 12:06PM | Last Updated: Jul 22 2018 12:05PMकराड: प्रतिनिधी 

कोयना धरणाचे दरवाजे रविवारी सलग दुसऱ्या दिवशी पाच फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. धरणात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 84.10 टीएमसी पाणी साठा झाला असून मागील वर्षीपेक्षा कोयना धरणात यावेळी सुमारे 18 टीएमसी जादा पाणीसाठा झाला आहे. धरणातून कोयना नदीत प्रतिसेंकद 24 हजार 511 क्युसेस पाणी सोडण्यात येत असून कोयना नदीसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

कोयना व कृष्‍णा नद्‍यांच्‍या पाणी पातळीत वाढ

महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणातून 17 जुलैपासून पाणी सोडण्यात येत आहे. पहिल्या दिवशी दुपारी धरणाचे सहा वक्री दरवाजे दोन फुटांनी उचलण्यात आले होते. मात्र कोयना, नवजा, महाबळेश्वरसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणाचे दरवाजे साडेतीन फुटांपर्यंत उचलण्यात आले होते. त्यामुळेच कोयना व कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. शनिवारपर्यंत पावसाचा जोर व धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण लक्षात घेत धरणाचे दरवाजे पुन्हा दीड फुटाने उचलण्यात येऊन ते शनिवारी पाच फुटांवर नेण्यात आले आहेत. रविवारपर्यंत दरवाजे पाच फुटांवरच स्थिर असून धरणात प्रतिसेंकद 28 हजार 667  क्युसेस पाण्याची आवक होत आहे. यापैकी 24 हजार 511 क्युसेस पाणी कोयना नदीत सोडले जात आहे.

धरण पूर्ण भरण्‍यास २१ टीएमसी पाण्‍याची गरज

रविवार सकाळपर्यंत कोयना येथे 69 मि. मी., नवजा येथे 39 मि. मी. तर महाबळेश्वर येथे 57 मि. मी. पावसाची नोंद झाली होती. 1 जूनपासून कोयना येथे 3 हजार 207, नवजा येथे 3 हजार 303 तर महाबळेश्वरमध्ये 2 हजार 899 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे 105 टीएमसी असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही 21 टीएमसी पाण्याची गरज आहे.