Sat, Jul 20, 2019 13:08होमपेज › Satara › नियतीने कष्टकर्‍यांची का करावी कू्रर थट्टा?

नियतीने कष्टकर्‍यांची का करावी कू्रर थट्टा?

Published On: Apr 11 2018 1:32AM | Last Updated: Apr 10 2018 11:35PMखंडाळा : वार्ताहर 

मंगळवारची पहाट कष्टकरी   18 लोकांसाठी काळरात्र ठरली. मोल मजुरी करून पोटाची खळगी भरण्यासाठी जात असलेल्या या सर्वांना  आपल्या आयुष्यात असे काही घडेल याची प्रचितीही आली नसेल. एका क्षणात सारं काही संपून गेलं. काय दोष होता त्या बिचार्‍या कष्टकर्‍यांचा? नियतीने का करावी अशी क्रूर थट्टा? असे प्रश्‍न उपस्थित झाले असून सदोष रस्ता तयार करणार्‍यांना हा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही, अशा संतप्‍त भावनाही खंडाळा तालुक्यातून व्यक्‍त होत आहेत.

मंगळवारी पहाटे साखरझोपेत असताना आयशर टेंपो (क्र. केए 37-6037)  विजापूरहून खांबाटकी बोगदा ओलांडून एस कॉर्नरवर पोहोचला. तीव्र उतारामुळे भरधाव वेगात आलेला टेंपो वळणावरील संरक्षक कठड्यास धडकला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. टेंपो कठड्यावर धडकून पलटी घेत सेवा रस्त्यावर आपटला. या टेंपोमध्ये विविध मजुरीची कामे करण्यासाठी सुमारे 35 जण शिरवळकडे निघाली होती. सोबत मजुरी कामासाठी लागणारी साधने, कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी सोबत घेतलेला संसार व सहकारी हे या अपघातात इतस्ततः फेकले गेले. सोबतच्या साहित्यामुळे यातील चालकासह 18 जण ठार झाले तर 17 जण गंभीर जखमी झाले. 

या  घटनेची खबर कळताच अवघ्या 10 मिनिटात खंडाळा पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी अंधारात जखमींचा आक्रोश किंकाळ्या ऐकून सारेच सुन्न झाले. सेंट्रींग साहित्य, भांडी कुंडी, सरपण, बिछाने, झोपडी उभी करण्यासाठीचे साहित्य यासह जखमी सर्वत्र विखुरले होते. सुरुवातीस गाडीत किती जण आहेत याचा अंदाज येत नव्हता. पोलिस व ग्रामस्थ बॅटरीच्या उजेडात माणसांचा शोध घेत होते. एकामागून एक मृत व जखमी व्यक्ती दिसत होता. हळूहळू उजाडत असताना साहित्याखाली दबलेली माणसे दृष्टीस पडू लागली. पोलिसांनी जखमींना तातडीने खंडाळा ग्रामीण रुगणालय व शिरवळ येथे दाखल केले.

या कामगारांसोबत दोन मोटार सायकलवर चौघेे जण पाठीमागून येत होते.  एस कॉर्नरवर अपघात घडल्याचे त्यांनी पाहिले. परंतु वाहन कठड्याच्या पलिकडे असल्याने त्यांना दिसले नाही. खंडाळ्याजवळ आल्यानंतर आपला ट्रक अजून का आला नाही याची वाट पहात थांबले. पुन्हा काही वेळात त्यांना अपघात झाल्याचे समजताच ते चौघे घटनास्थळी पोहोचले. समोरचे दृश्य पाहून ते भीतीने गर्भगळीत झाले.पोलिस व ग्रामस्थांनी त्यांना धीर दिला. या अपघात सोबत आणलेली शेळी बचावली. एक लहान मुलही सुदैवाने बचावले. देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती या अपघातात आली. 

 

Tags : satara, satara news,  khabataki ghat, truck accident,