Thu, Apr 25, 2019 21:40होमपेज › Satara › जोतिबा यात्रेसाठी पाडळीतून बैलगाड्या रवाना

जोतिबा यात्रेसाठी पाडळीतून बैलगाड्या रवाना

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

तीर्थक्षेत्र पाडळी (निनाम) ता. जि. सातारा येथून मंगळवारी रात्री 10 वाजता कोल्हापूरच्या जोतिबा यात्रेसाठी  गावातील व परिसरातील 25 ते 30 बैलगाड्या रवाना झाल्या. आजच्या काळात पूर्वजांची ही परंपरा यात्रेत जोपासणारे पाडळी हे एकमेव गाव आहे. यात्रेस जाणे व येणे असा 8 दिवसांचा एकूण 300 कि.मी.चा प्रवास असतो. ग्रामीण भागातील बैल जोपासणारांची संख्या कमी होत असताना जोतिबा यात्रेसाठी बैलगाडी नेणार्‍यांच्या संख्येत प्रत्येकवर्षी मात्र वाढ होताना दिसते. भर ऊन्हात व रात्रीचा  प्रवास याद्वारे यात्रेकरु आनंदाने करतात. सोबत चारा घेतला जातो.

पाडळी  ते उंब्रज रात्रीचा प्रवास, उंब्रज ते कराड दिवसा, कराड ते कासेगाव रात्री, कासेगाव ते ऐतवडे दिवसा, ऐतवडे ते डोंगर पायथा दिवसाचा प्रवास असतो. पूर्वी वाहनांची संख्या कमी असल्याने लहान मुले, स्त्रिया व ज्येष्ठ नागरिक यांना बैलगाडीशिवाय यात्रा पाहता येत नसे. यासाठी ही प्रथा रुढ झाली आहे. आधुनिक काळात एवढ्या मोठ्या  संख्येने 8 दिवस बैलगाडीतून यात्रेसाठी जाणारे पाडळी हे एकमेव गाव आहे. गाडी बांधण्याची कला पाडळीत मिळते. प्रदूषण मुक्‍त, निसर्गाचा जवळून अभ्यास, अनेक गावांचा प्रत्यक्ष संपर्क, चाली रिती यांची माहिती तसेच निरनिराळी पिके यांचा अभ्यास होतो. तसेच कमी खर्चात कुटुंबास यात्रा घडते. 

जोतिर्लिंग निशाणाची शोभाही वाढतच असते. बैलगाडीची यात्रा कायम स्मरणात राहते. एकदा तरी अशी यात्रा प्रत्येकाने करावी. यात्रा कमिटीद्वारे बैलगाडी मालकांना अर्थसहाय्यही दिले जाते. प्रत्येक गाडीवानाचा सत्कारही केला जातो. प्रत्येक शेतकरी बैलांची जोपासणा यात्रेसाठी वर्षभर करत असतो. वाटेत प्रवासात स्थानिक लोक पाणी व जागेची तसेच राहण्याची व्यवस्था आपुलकीने करतात.

कोणतीही अडचण भासत नाही. मुक्‍कामाची व्यवस्था पूर्वीपासूनच ठिकाणावरच केली जाते. ही यात्रा परिसरातील भाविक मोठ्या आनंदाने पाहतात व बैलांना ओवाळतात. कोल्हापूरच्या जोतिबा यात्रेसाठी रवाना होणार्‍या बैलगाड्यास शुभेच्छा देण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. पुजारी शिंग फुंकून चांगभलंच्या गजरात बैलगाड्यांचा प्रवास सुरु होतो.
 


  •