Tue, Jul 23, 2019 06:18होमपेज › Satara › फुफ्फुसाच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

फुफ्फुसाच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

Published On: Jan 17 2018 2:04AM | Last Updated: Jan 17 2018 1:18AM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

पारगाव ता. खंडाळा येथील  प्रियांका  पवार  फुफ्फुसाच्या आजाराशी झुंज देत असून त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी 35 लाख रुपये खर्च येणार आहे. पवार कुटुंबियांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे. आत्तापर्यंत सुमारे दहा लाखावर खर्च झाला असून शस्त्रक्रियेसाठी येणार्‍या मोठ्या खर्चासाठी विविध सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींना पवार कुटुंबीयांनी मदतीचे आवाहन केले आहे. आपल्या मदतीने एकाला जीवदान तर दोन चिमुकल्या बाळांना त्यांची आई मिळू शकते, त्यासाठी गरज आहे ती तुमच्या मदतीची.  

पारगाव येथील एका गरीब कुटुंबातील प्रियांका अमर पवार या  25 वर्षाच्या  महिलेला फुफ्फुसाच्या  आजाराने घेरले आहे. आपल्या 2 व 4 वर्षाच्या चिमुरड्यांना घरातच ठेवून गेल्या 2 वर्षापासून त्या या आजाराशी झुंज देत आहेत. पुणे, मुंबई, सातारा  व अन्य वेगवेगळ्या रूग्णालयांमध्ये उपचार घेवूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी सर्व तपासण्याअंती  फुफ्फुस बदलण्याचा अंतिम सल्ला दिला आहे.

पती अमर पवार यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांनी आतापर्यंत पै पै जमा करून  उपचारासाठी प्रयत्न केले. प्रियांका यांना चेन्नई येथील ग्लोबल रूग्णालयात फाईल नंबर यूएचआयडी 1020237937 या क्रमांकाने  दाखल केले आहे. पण रोजचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. फुफ्फुस बदलण्यासाठी सुमारे 35 लाख रुपयांचा खर्च रूग्णालय प्रशासनाने सांगितला आहे.

अमर पवार यांच्याकडे असलेले पैसे औषधोपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाले आहेत. मात्र फुफ्फुसाच्या शस्त्रक्रियेसाठी 35 लाख रुपयांची गरज असल्याने सेवाभावी व सामाजिक संस्था, दानशुर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन पवार कुटुंबीयांनी केले आहे. दानशुर व्यक्ती व संस्थांनी अमर ईश्‍वर पवार यांच्या एचडीएफसी बँक शाखा शिरवळ (आयएफसी कोड नंबर एचडीएफसी 0002202) खाते क्रमांक  22021740005055 किंवा बँक ऑफ बडोदा (आयएफसी कोड नंबर इअठइजथअखददद खाते क्रमांक 37610100001498 यावर मदत पाठवावी, असे आवाहन पवार कुटुंबियांनी केले आहे.