Thu, May 28, 2020 09:20होमपेज › Satara › सरकारच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमधून ग्रामसेवक ‘लेफ्ट’

सरकारच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमधून ग्रामसेवक ‘लेफ्ट’

Published On: Jan 10 2018 2:00AM | Last Updated: Jan 10 2018 2:00AM

बुकमार्क करा
सातारा : प्रवीण शिंगटे

सध्या व्हॉटस्अपचा जमाना असून अनेकजन दिवसभर व्हॉटसअपवर ऑनलाईन असल्याचेही वारंवार दिसत असते. सार्‍यांनाच भुरळ घालणारे व्हॉटसअप ग्रामसेवकांना मात्र डोकेदुखी होवून बसले आहे. त्याला कारणही तसेच आहे. या ग्रामसेवकांचा राज्य शासनाने प्रत्येक पंचायत समितीनिहाय  एक ग्रुप तयार केला असून या ग्रुपवर तालुक्यातील  ग्रामसेवकांना कामकाजाच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी सूचना व आदेश देत असतात. मात्र, या सूचना व आदेशामुळे ग्रामसेवक त्रस्त झाले आहेत. दररोजच्याच वारंवार येणार्‍या या सूचनामुळे वैतागलेल्या सातारा जिल्ह्यातील सुमारे 10 हजार ग्रामसेवक शासनाच्या या ग्रुपमधून ‘लेफ्ट’  झाले आहेत. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

व्हॉटसअ‍ॅप अनेकांसाठी आवडीचा विषय असला तरी  विशेषत: शासकीय कर्मचार्‍यांना व्हॉटसअ‍ॅप  नकोसे झाले आहे. ग्रामसेवकाचा पंचायत समिती स्तरावर व्हॉटसअ‍ॅप ग्रुप असून त्याचे अ‍ॅडमिन संबंधीत तालुक्याचे विस्तार अधिकारी व टीपीओ आहेत. अधिकारी व पदाधिकारी या ग्रुपद्वारे ग्रामसेवकांना दररोज विविध आदेश व सूचना सोडत असतात.  दररोजच्या या सूचनांमुळे ग्रामसेवक चांगलेच त्रस्त झाले आहेत. काम सोडून हा व्हॉटसअ‍ॅप ग्रुप अपडेट करण्यातच ताकद खर्ची होत असल्याची बहुतांश ग्रामसेवकांची तक्रार आहे. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती व अन्य विभागाचे वरीष्ठ अधिकारी, पदाधिकारी व्हॉटसअ‍ॅप व सोशलमिडीयाच्याद्वारे ग्रामसेवकांना रात्री, अपरात्री केव्हाही सतत धमकी वजा आदेश देत असतात. तसेच तात्काळ कामे झाली पाहिजेत. तात्काळ मिटींग घेवून कामांचा त्वरित निपटारा करा असे आदेश देत असतात. शासनाने खालून दिलेले नियम व कायदे मोडीत काढत असतात. या सर्व प्रकारामुळे  ग्रामसेवकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. अनेकांना रक्तदाबाचा त्रास उदभवू लागला आहे.

त्रस्त झालेल्या सातारा जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी  1 जानेवारीपासून व्हॉटसअ‍ॅप, सोशल मिडीयाला रामराम ठोकला आहे. तसेच सरकारी ग्रुपमधून बाहेर पडण्याचा  निर्णय घेतला आहे. सातारा 141, कोरेगाव 91, खटाव 90, माण 67, फलटण 104, खंडाळा 43,  वाई 68, महाबळेश्‍वर 44, जावली 68, कराड 152, पाटण  137  असे मिळून  168 ग्रामविकास अधिकारी व 837 ग्रामसेवक  व्हॉटसअ‍ॅपमधून बाहेर पडले आहेत.

तसेच ईमेल व इतर अधिकृत संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच स्मार्ट फोन, एसबीएम अ‍ॅप, फोटो अपलोड, कापणी प्रयोग अ‍ॅप, जियो टॅगिंग इत्यादी कामासाठी ग्रामसेवक स्वत:चा मोबाईलवर अ‍ॅप डाऊनलोड करणार नाहीत. सध्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वीत करण्यात आले असून या कामापोटी ग्रामपंचायत दर महिन्याला संबंधीत कंपनीस 12 हजार रुपये वर्ग करीत आहे.