Tue, Jul 16, 2019 21:50होमपेज › Satara › सातारा : वस्ती साकुर्डीतील वृद्धेचा गॅस्ट्रोमुळे मृत्यू

सातारा : वस्ती साकुर्डीतील वृद्धेचा गॅस्ट्रोमुळे मृत्यू

Published On: May 19 2018 12:52PM | Last Updated: May 19 2018 12:51PMकराडः प्रतिनिधी 

वस्ती साकुर्डी (ता. कराड) येथे दुषित पाण्यामुळे गेल्या आठवड्यात सुमारे २६० जणांना गॅस्ट्रो सदृश साथीची लागण झाली होती. यापैकी ९ रूग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. दरम्यान, अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या अनुसया निवृत्ती कणसे (वय ९०) यांचा शुक्रवारी रात्री कृष्णा रूग्णालयात मृत्यू झाला. दुषित पाण्याने वस्ती साकुर्डीत पहिला बळी गेल्याने कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

आठवडाभरापूर्वी वस्ती साकुर्डी येथे १४४ जणांसह अन्य ११७ जणांना गॅस्ट्रोसदृश साथीची लागण झाली होती. ११७ जणांवर गावात प्राथमिक उपचार करण्यात आले होते. तर उर्वरित १४४ जणांवर कराडच्या सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयासह कराडमधील खाजगी रूग्णालये, मलकापूरमधील कृष्णा रूग्णालयात या सर्वांवर उपचार सुरू होते. यापैकी एक असलेल्या अनुसया कणसे यांना १३ मे रोजी कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर अतिदक्षता रूग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर वस्ती साकुर्डी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, कराडमधील सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात सात तर कृष्णा रूग्णालयात दोन अशा वस्ती साकुर्डीतील नऊ जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत, असे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.