Fri, Apr 26, 2019 19:30होमपेज › Satara › शिवसेना स्टाईलने अजित पवार यांना उत्तर देऊ : चंद्रकांत जाधव

शिवसेना स्टाईलने अजित पवार यांना उत्तर देऊ : चंद्रकांत जाधव

Published On: Apr 10 2018 1:13AM | Last Updated: Apr 09 2018 11:58PMसातारा : प्रतिनिधी

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांधी मैदानावर केलेले वक्‍तव्य निषेधार्ह आहे. ‘स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसर्‍याचे बघायचे वाकून’ ही पद्धत बंद करावी. शिवसेेनेवरील टीका थांबवावी, अन्यथा आमच्या स्टाईलने उत्तर देवू, असा इशारा  शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी दिला आहे.  गांधी मैदान येथे झालेल्या हल्लाबोल सभेमध्ये बोलताना अजित पवारांनी केलेल्या वक्‍तव्याचा समाचार घेताना चंद्रकांत जाधव  म्हणाले, अनेक वर्षे जनतेच्या पैशावर डल्ला मारणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या भूमिकेविषयी काळजी करण्याचे काहीच कारण नाही.

शिवसेनेची काळजी करण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे समर्थ आहेत व त्यांना सर्व शिवसैनिकांची समर्थ साथ आहे. तेव्हा शिवसेनेने अर्धनारी नटेश्वराची भूमिका सोडावी हे बेताल वक्तव्य अजित पवार यांना शोभा देत नाही. सातारी जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता दिल्यानंतर सातारकरांच्या कशा कशावर राष्ट्रवादीने डल्ला मारला हे सातारकर जनता विसरली नाही. सुरुवातीला सत्ता दिल्या दिल्या सातारा औद्योगिक क्षेत्रामध्ये डॉक्टर बॅग उद्योग, सुटकेस कंपनी हे उद्योग सातारकर जनतेला रोजगार उपलब्ध करुन देणारे होते.

मात्र या उद्योगावर डल्ला मारुन ते कोणी बारामतीला पळवले हे न कळण्या इतकी सातारी जनता तुम्ही दुधखुळी समजता का? नंतरच्या पाच वर्षात सातारी जनतेच्या वाटणीचे पाणी, वीज यावर कोणी डल्ला मारला हे सुध्दा सातारी जनता विसरली नसल्याचे ते म्हणाले. चंद्रकांत जाधव पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील सर्व साखर सम्राट आमदारांना आपण शेतकर्‍यांच्या उसाची बिले वेळेत द्यायला सांगितली असती तर तुम्हाला हल्लाबोल यात्रा काढण्याची गरज नव्हती. परंतु सर्व संवगड्यांच्या  मदतीने डल्ला मारण्याची सवय असणार्‍या अजितदादांनी फक्त शिवसेनेवर तोंड सुख घेण्यासाठी हल्लाबोल यात्रा काढली असल्याचे दिसत आहे.

अजित पवार म्हणाले होते की, मला सत्ता द्या जर मी जनतेचे काम नाही केले तर पवाराचे नाव सांगणार नाही. गेली पंधरा वर्षे सत्ता असताना आपण मग कुणाचे नाव सांगत होता. तेव्हा आपण कामे का नाही केली? असा रोखठोक सवाल चंद्रकांतदादा यांनी केला आहे. अजितदादा तुम्हाला सत्ता दिली तेव्हा जनतेच्या कष्टाच्या पैशावर उभ्या राहिलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर कुणी डल्ला मारला हे सुध्दा सातारा जिल्ह्यातील जनता विसरली नाही.

 तेव्हा शिवसेनेला नावे ठेवणे हा एकमेव कार्यक्रम थांबवून दादा दुसर्‍याचं वाकून पाहण्यापेक्षा स्वत: आजपर्यंत मारलेल्या डल्याचा विचार करा, अशी टीकाही चंद्रकांतदादांनी केली. शिवसेनेवर टिका करण्यापेक्षा प्रथम डल्ला मारण्याची प्रवृत्ती  थांबवा अन्यथा शिवसैनिक आपल्या स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही, हे अजित पवार यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही चंद्रकांतदादा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
 

 

tags : Satara,news, former, Deputy, Chief, Minister, Ajit ,Pawar's, statement,protest,