होमपेज › Satara › आगलाव्यांमुळे निसर्गरम्य सातारा काळवंडला

आगलाव्यांमुळे निसर्गरम्य सातारा काळवंडला

Published On: Feb 03 2018 2:15AM | Last Updated: Feb 02 2018 10:49PMसातारा : सुशांत पाटील

गेल्या महिन्यापासून निसर्गरम्य असलेल्या सातार्‍यातील डोंगरांना आग लावण्याचे प्रकार वाढले आहेत. खुरटे गवत व काटेरी झुडपांनी सातार्‍याचा परिसर व्यापला असल्यामुळे आग लावण्याच्या प्रकारामुळे  हजारो एकराची वनसंपदा जळून खाक होत आहे. प्रशासनाला आगलावे शोधण्याचे आव्हान असून या प्रकारात अंधश्रध्देचीही काही कारणे समोर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वन विभागाने  कठोर कारवाई गरज सातारकरांतून व्यक्‍त होऊ लागली आहे.  निसर्गरम्य सातार्‍याचा पसारा फार काही नाही, पण त्याला इतिहास खूप मोठा आहे. दर्‍याखोर्‍याबरोबर सातार्‍याच्या मांडीवर निसर्गरम्य, भन्‍नाट व वैशिष्ट्यपूर्ण अशी डोंगराळ ठिकाणे आहेत. मात्र या देखाण्याशा निसर्गाला बाधित करण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून समाजकंटकाकडून होत आहे. 

नुकतेेच तापोळा, ऐतिहासिक अजिंक्यतारा तसेच जागतिक वारसास्थळात समावेश असलेल्या कास पठाराला वणवे लावण्याचे प्रकार काही लोकांनी केले आहेत. गेल्या महिन्यात जावळीच्या करंडी खिंडीत अज्ञाताने लावलेल्या आगीत सामाजिक वनीकरण अंतर्गत लावलेली हजारो झाडे जळून खाक झाली तर जगप्रसिध्द पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाबळेश्‍वर येथील लॉडविक पाँईट येथे पर्यटकाने सिगरेट फेकल्यामुळे या 5 किमी परिसरातील झाडे झुडपे जळून भस्मसात झाली. 

या वणव्यात छोटे मोठे सुक्ष्मजीव, पक्षी देखील भक्ष्यस्थानी पडतात. हजारो एकरातील वनसंपदा जळून खाक होत आहे. डोंगराळ भागामुळे आग आटोक्यात आणताना वन विभागाची व परिसरातील नागरिकांची चांगलीच धावपळ होते. डोंगराला आग लावणारा आजतागायत सापडला नाही. डोंगराळ परिसरात वणवे लागल्यानंतर तेथे आग आटोक्यात आणण्यासाठी  मनुष्याशिवाय कोणतीच यंत्रणा पोहचू शकत नाही.  त्यामुळे आग लागू नये म्हणून वन विभागाने प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच वनसंपदेचे संरक्षण व्हावे यासाठी परिसरात लोकांमध्येदेखील कॅम्पेनिंग राबवण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्‍त होत आहेत.  सध्या आग लावण्याच्या प्रकारात वाढ होत असून हा प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

मुक्या जीवाला चारा आणायचा तरी कुठून?

सातार्‍यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात उगवलेले गवत गावातील नागरिक गुरांसाठी कापतात. मात्र आग लावण्याच्या प्रकारामुळे शेतकर्‍यांची जनावरांच्या चार्‍यासाठी वणवण होत आहे. चारा जाळल्यामुळे तो आणायचा तरी कुठून असा प्रश्‍न शेतकर्‍यांपुढे पडत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी नागरिक करु लागले आहेत.