Sun, May 26, 2019 11:07होमपेज › Satara › वणवा पेटला पण उपाययोजनांची वानवा 

वणवा पेटला पण उपाययोजनांची वानवा 

Published On: Feb 14 2018 2:56AM | Last Updated: Feb 13 2018 10:10PMसातारा : प्रवीण शिंगटे

सातारा जिल्ह्यात वणवा लावण्याचे प्रकार वाढले असून त्यामुळे होणारे प्रदुषण व निसर्ग हानीकडे प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत आहे. वणवा पेटला तरी उपाययोजनांबाबत मात्र वानवा असल्याचे अनेकदा समोर आले आहे. वणव्याच्या वाढत्या घटनांमुळे वनसंपदा तर जळून खाक होतच आहे, शिवाय अनेक दुर्मिळ व औषधोपयोगी वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात येवू लागले आहे. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाचा परिसर म्हटला की दूरपर्यंत गर्द वनराईने नटलेल्या उंच टेकड्या, ऐतिहासिक पाण्याची तळी, झरे, औषधी वनस्पती, असे निसर्गरम्य वातावरण असे काही वर्षापूर्वीचे चित्र होते.

मात्र, हे डोंगर दर्‍याखोर्‍यातील  चित्र आता बदलू लागले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वन हद्दीलगतच्या भागात होत असलेले नागरीकरण व वेगाने झालेली जंगलतोड,  सुकलेल्या गवताला लावले जाणारे वणवे आहेत. तरीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने बेसुमार वृक्षतोडीला आणखी चालना मिळत आहे. सातारा जिल्ह्याच्या डोंगराळ भागातील गवताला वणवे लावण्याची विकृत मनोवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने नेहमी हिरव्यागार दिसणार्‍या डोंगररांगा आता काळ्याकुट्ट होताना दिसत आहेत. या वणव्यात निसर्गाच्या जीवनचक्रातील साखळीतील महत्वाचे कीटक, पक्षांची घरटी, उद्ध्वस्त होताना दिसत आहेत.  यात दुर्मिळ वनौषधीही नष्ट होत आहेत. 

वनविभागाच्या हद्दीतील डोंगर कपारीतील झाडांना सतत लागत असलेल्या वणव्यामुळे डोंगर काळेकुट्ट व भकास होत आहेत. विविध प्रकारच्या झाडांचे व वृक्षांचे अज्ञातांनी लावलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  या नुकसानीमुळे पर्यावरणाबरोबर निसर्ग संपदेची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे प्रकार यापूर्वीही अनेकदा उघडकीस  आले आहेत.