Sun, Nov 18, 2018 20:45होमपेज › Satara › सातारा जिल्ह्याला लागलाय बालदमा

सातारा जिल्ह्याला लागलाय बालदमा

Published On: May 11 2018 1:44AM | Last Updated: May 11 2018 12:43AMसातारा : प्रतिनिधी

वाढते प्रदूषण, आहारातल्या चुकीच्या सवयी, उपचाराकडे होणारे दुर्लक्ष यामुळे लहान बालकांमध्ये दम्याचा आजार वाढत आहे. रुग्णालयात येणार्‍या रुग्णांपैकी सुमारे तीन टक्के बालकांना दम्याचा त्रास असल्याचे आढळून आले आहे.  सातारा जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील हे वास्तव आरोग्य यंत्रणेसाठी आव्हान समजले जात आहे.

पूर्वी मोठ्यांमध्ये दम्याचा आजार असण्याचे प्रमाण अधिक होते. सध्या या आजाराने लहान मुलेही त्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. बालदम्याची वाढती संख्या चिंताजनक बनत  चालली आहे.  जिल्हा रुग्णालयात दिवसाकाठी तपासणीसाठी आलेल्या रुग्णांमध्ये सुमारे 80 टक्के रुग्ण ताप, सर्दी व इतर साथीच्या आजारांवर उपचारांसाठी येतात. यामध्ये सुमारे तीन टक्के बालकांना दम्याच्या त्रासावर उपचार घ्यावे लागत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वायू प्रदुषणही वाढत आहे. जिल्ह्यात सुमारे  8 लाख  14 हजार 968 वाहने धावत असून या वाहनांमध्ये  हजारो वाहने कालबाह्य आहेत. त्यांच्या माध्यमातून दररोज शहरामध्ये लाखो लिटर पेट्रोलचा धूर निघत  आहे.  या धूरातून हवेत  मोठ्या प्रमाणावर  कार्बन डायऑक्साईड मिसळत आहे. त्यामुळे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. तसेच आवश्यक तेवढा शुध्द ऑक्सिजन मिळत नाही.  श्‍वासाबरोबर कार्बनडाय ऑक्साईड फुफ्फुसात जात असल्याने  श्‍वसनविकार वाढत आहेत. श्‍वसनविकारामध्ये दमा रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे आरोग्य सर्व्हेमध्ये आवढळून आले आहे.

पूर्वीपेक्षा लहान मुलांमध्ये दम्याचा आजार वाढत असल्याने काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.  वाहनांबरोबरच  हवेमधील धुळीच्या कणांमध्येही वाढ होत आहे. इमारतींचे बांधकाम, जुन्या इमारती पाडणे, त्याचा मलबा हटवणे यातून हवेमध्ये धूलीकण वाढत आहेत. त्यामुळेही दमा विकारामध्ये   मोठ्या प्रमाण वाढ होत आहे. याबरोबरच शहरात जंक फूडची विक्री करणारी मोठी हॉटेल्स संस्कृती बोकाळत आहे. सहाजिकच जंक फूड खाणार्‍या मुलांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे.   त्यामुळे पौष्टिक व सकस अन्नपदार्थ  खाल्ले जात नसल्यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती  कमी होत आहे. परिणामी मुले आजारांना त्वरीत बळी पडत आहेत.

लस उपलब्ध नाही 
पोलिओची लस घेऊन पोलिओ होऊ नये यासाठी खबरदारी घेता येते. त्यासाठी लसीची पुरेशी उपलब्धता देखील आहे; मात्र दमा होऊ नये यासाठी असणारी लसच बाजारामध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांनी मुलांना हा त्रास होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

असा टाळू शकतो दमा
 रस्त्यावरील प्रदूषणापासून दूर राहणे.
  प्राणायाम, मेडिटेशन, व्यायाम करणे.
  जंक फूड टाळणे, सकस आहार घेणे.
  घरातील परिसरात झाडे लावणे.
  मास्क वापरणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे.