होमपेज › Satara › मराठा क्रांतीचा भव्य महामोर्चा

सातारा जिल्हा उद्या बंद, बेमुदत ठिय्या आंदोलन

Published On: Jul 24 2018 4:20PM | Last Updated: Jul 24 2018 4:20PMसातारा : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात शासन वेळ काढूपणा घेत असल्याच्या निषेधार्त राजधानी सातार्‍याच्या मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने उद्या बुधवार,  25 रोजी संपूर्ण सातारा जिल्हा बंद ठेवण्याची हाक दिली आहे. सातार्‍यात मंगळवारी झालेल्या मराठा समाजाच्या तोबा गर्दीच्या साक्षीने ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. बुधवारी सकाळी राजवाड्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय समितीने जाहीर केला. 

वारकर्‍यांना बंदचा फटका बसू नये, यासाठी  उद्या बंद

मराठा आरक्षणासाठी औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या युवकाने जलसमाधी घेतल्यानंतर राज्यभरातील वातावरण संतप्त झाले. औरंगाबादेतून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यानुसार मंगळवारी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. सातारा जिल्ह्यातून बहुतांश वारकरी पंढरपूरला जात असतात. त्यांना बंदचा फटका बसू नये म्हणून सातारा जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने महाराष्ट्र बंद दिवशी बंद न ठेवता दुसर्‍या दिवशी म्हणजे बुधवारी दि. 25 रोजी सातारा जिल्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. 

कसे असणार मोर्चाचे स्‍वरुप

बुधवारी सकाळी 9 वाजता सातार्‍यातील राजवाडा येथून महामोर्चाला प्रारंभ केला जाईल. मोर्चाच्या अग्रभागी पायी चालणारा समाज व त्या पाठोपाठ युवक युवतींची मोटारसायकल रॅली असे शिस्तबध्द नियोजन असणार आहे. राजवाड्यावरून मोती चौक, राजपथ, देवी चौक, कमानी हौद, शाहु चौक, रयत शिक्षण संस्था मार्गे पोवई नाक्यावर महामोर्चा येईल. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येईल. तेथे मोर्चाची सांगता करून बेमुदत ठिय्या आंदोलनाचे हत्यार हाती घेण्यात येईल, असे समितीच्यावतीने जाहीर करण्यात आले.

सातारा जिल्हा बंदची हाक मोर्चा दरम्यान दिली जाणार असल्याने व्यापारी, व्यवसायिक, शाळा, महाविद्यालये, एस. टी.  जीप, रिक्षा बंद राहणार आहेत. शाळा महाविद्यालयांसह सर्व संघटनांनी या बंदला पाठिंबा दिल्याने संपूर्ण सातारा जिल्हाच बंद राहणार आहे. जिल्हा पोलिस दल व समन्वय समिती यांच्यात चर्चा होऊन सातारा जिल्ह्याची शांतता अबाधित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.