Fri, Sep 21, 2018 21:32



होमपेज › Satara › सातारा जिल्हा आज बंद राहणार

सातारा जिल्हा आज बंद राहणार

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 25 2018 12:03AM



सातारा : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात शासन वेळकाढूपणा करत  असल्याच्या निषेधार्थ राजधानी सातार्‍याच्या मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने उद्या, बुधवारी (दि. 25)संपूर्ण सातारा जिल्हा बंद ठेवण्याची हाक दिली आहे. सातार्‍यात मंगळवारी मराठा समाजाच्या तोबा गर्दीच्या साक्षीने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. बुधवारी सकाळी राजवाड्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय समितीने जाहीर केला. 

मराठा आरक्षणासाठी औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या युवकाने जलसमाधी घेतल्यानंतर राज्यभरातील वातावरण संतप्‍त झाले. औरंगाबादेतून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यानुसार मंगळवारी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. सातारा जिल्ह्यातून बहुतांश वारकरी पंढरपूरला जात असतात. त्यांना बंदचा फटका बसू नये म्हणून सातारा जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने महाराष्ट्र बंद दिवशी बंद  न ठेवता दुसर्‍या दिवशी म्हणजे बुधवारी दि. 25 रोेजी सातारा जिल्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या संदर्भातील नियोजन करण्यासाठी कल्याण रिसॉर्ट येथे मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीला मराठा समाजातील सर्व स्तरातील जनतेने तोबा गर्दी केली होती. विशेषत: युवक व युवतींची लक्षणीय उपस्थिती होती. बैठकीला उपस्थित असणार्‍या युवक व युवतींनी अत्यंत आक्रमक भूमिका घेण्याची मागणी केली. त्यानुसार समितीनेही आक्रमक पवित्रा जाहीर केला. 

बुधवारी सकाळी 9 वाजता सातार्‍यातील राजवाडा येथून महामोर्चाला प्रारंभ केला जाईल. मोर्चाच्या अग्रभागी पायी चालणारा समाज व त्या पाठोपाठ युवक युवतींची मोटारसायकल रॅली असे शिस्तबध्द नियोजन असणार आहे. राजवाड्यावरून मोती चौक, राजपथ, देवी चौक, कमानी हौद, शाहु चौक, रयत शिक्षण संस्था मार्गे पोवई नाक्यावर महामोर्चा येईल. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येईल. तेथे मोर्चाची सांगता करून बेमुदत ठिय्या आंदोलनाचे हत्यार हाती घेण्यात येईल, असे समितीच्यावतीने जाहीर करण्यात आले. सातारा जिल्हा बंदची हाक मोर्चादरम्यान दिली जाणार असल्याने व्यापारी, व्यवसायिक, शाळा, महाविद्यालये, एस. टी,  जीप, रिक्षा बंद राहणार आहेत. शाळा, महाविद्यालयांसह सर्व संघटनांनी या बंदला पाठिंबा दिल्याने संपूर्ण सातारा जिल्हाच बंद राहणार आहे. बंद दरम्यान, जाळपोळ, तोडफोड, गाड्यांची हवा सोडणे, महामार्ग रोको असे कोणतेही अनुचित प्रकार करू नयेत, असे आवाहनही समन्वय समितीने केले. मोर्चाची बदनामी करण्याच्या हेतूने काही अपप्रवृत्ती हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करतील. त्याबाबत समाजबांधवांनी जागरूक राहून शांततेने बंद यशस्वी करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील खासदार,  आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, उद्योजक, व्यापारी, शिक्षक, डॉक्टर, वकील, अभियंते, अधिकारी, कर्मचारी व सर्वच स्तरातील समाज बांधवानी पद, पक्ष, संघटना बाजूला सारून महामोर्चा व ठिय्या आंदोलनात सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बैठकीनंतर समन्वय समितीला जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी चर्चेचे निमंत्रण दिले. त्यानुसार जिल्हा पोलिस दल व समन्वय समिती यांच्यात  चर्चा होऊन सातारा जिल्ह्याची शांतता अबाधित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.