Wed, Apr 24, 2019 01:32होमपेज › Satara › सातारा विकास आघाडी म्हणजे फेकू सरकार

सातारा विकास आघाडी म्हणजे फेकू सरकार

Published On: Feb 11 2018 12:57AM | Last Updated: Feb 10 2018 10:34PMसातारा : प्रतिनिधी 

सातारा नगरपालिकेत जनतेने सातारा विकास आघाडीला संधी दिली. प्रभावीपणे काम करावे यासाठी सातारकरांनी वर्षभर वाट पाहिली. मात्र, साविआकडून चांगले काम झालेच नाही. सातार्‍यात ज्या विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे त्यातील बरीच कामे मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पाठपुरावा केला, हे विसरु नका. न केलेल्या कामाचे श्रेय घेणारी सातारा विकास आघाडी म्हणजे फेकू सरकार आहे, असा पलटवार नविआ नगरसेवक शेखर मोरे-पाटील, नगरसेविका लीना गोरे यांनी केला. याबाबत प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, लोकशाही पध्दतीने विरोधी पक्ष म्हणून नगर विकास आघाडीने आवाज उठवला.

जनतेचे प्रश्‍न मांडणे म्हणजे पोटशूळ उठणे नव्हे हे लक्षात घ्या. सातारा विकास आघाडीमध्ये अनागोंदी आहे ही वस्तुस्थिती असून ती जनतेसमोर आल्यानेच साविआने निरर्थक आरोप केले. सातारा विकास आघाडी  सांगत असलेली कास धरण उंची वाढवणे, पोवई नाका ग्रेडसेपरेटर, भुयारी गटार योजना ही सर्व कामे मनोमलनाच्या काळात मंजूर झाली. त्यासाठी  नविआचे नेते आ. शिवेंद्रराजे भोसले यांनीही वेळोवेळी पाठपुरावा केला. कास धरण उंची वाढवण्याबाबत सांगायचे झाले  तर त्यावेळेस सुजल निर्मल ही योजना शहरासाठी नव्हती परंतु तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यात  बैठक झाली.

त्यात कास रस्त्यावरील 15 गावांचा समावेश केला. त्यामुळे कास धरण उंची वाढवणे योजना मंजूर होऊ शकली हे विसरु नका. मुख्याधिकार्‍यांची  पाठराखण करता त्यावरुनच तुमचा भ्रष्टाचारमुक्‍त कारभार सातारकरांना दिसत आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षा या कठपुतली झाल्या आहेत. सातारा विकास आघाडीमध्ये समन्वय नाही. नगराध्यक्षांचा सातारा विकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांवर  विश्‍वास नाही. त्यामुळेच आठ दिवस रजेवर गेल्या तरी त्यांनी कुणावरही  विश्‍वास ठेवला नाही. सातारा नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीची जागा अजून हस्तांतरित झालेली नाही.

नगरपालिकेच्या नावावर जागा नसतानाच अजून हा विषय मंजूरही नाही. तोवर साविआने भूमिपूजनाचा घाट घातला आहे. सातारा विकास आघाडीची दिखाऊपणाची गडबड सातारकरांना कळत असून नुसती मोठी मोठी स्वप्ने दाखवायची पण करायचे काहीच नाही, असा टोलाही नगरसेवक शेखर मोरे-पाटील व नगरसेविका सौ. लीना गोरे यांनी पत्रकाद्वारे हाणला आहे.