होमपेज › Satara › सायबर सेलला ‘पोनि’ची वानवा

सायबर सेलला ‘पोनि’ची वानवा

Published On: Dec 20 2017 1:44AM | Last Updated: Dec 19 2017 11:36PM

बुकमार्क करा

सातारा : विठ्ठल हेंद्रे

महाराष्ट्र पोलिस दलाने जिल्हानिहाय सायबर सेलची स्थापना केल्यानंतर तांत्रिक गुन्हे उकल होण्यास मोठी मदत मिळेल, अशी आशा निर्माण झाली असताना त्याठिकाणी पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी पदच नियुक्त केले जात नसल्याने सायबर तपासावर मर्यादा येत आहेत. दरम्यान, राज्यात अवघ्या चार जिल्ह्यातच पोनि दर्जाची पदे असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली 
आहे.

1 जानेवारी 2016 रोजी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यात सायबर सेलची स्थापना करत पोलिस दलाला बळकट करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला. स्वतंत्र सायबर सेल झाल्याने पोलिसांच्याही अपेक्षा वाढल्या. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने सायबर सेलसाठी लागणारी बहुतेक यंत्रसामुग्रीही दिली. अद्यावत व सुसज्ज इमारत, कंम्प्युटर, तांत्रिक सर्व यंत्रणा दिली गेली. सायबर सेल स्थापन करत असताना पोलिस कर्मचार्‍यांची तरतुदही करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये सायबर सेल उभा करत असताना सायबर अ‍ॅक्टअन्वये गुन्हे थेट याच विभागात दाखल करण्यासही सुरुवात झाली.

सायबर गुन्हेगारीसाठी बंदूक, तलवार, चाकूची गरज भासत नाही. केवळ मोबाईल, सोशल मिडियाच्या माध्यमातून हे गुन्हे सहजपणे केले जात आहेत. अशा पध्दतीचे गुन्हे गेल्या पाच वर्षापासून वाढत  असून सायबर  गुन्हेगारी हा सध्या महाराष्ट्राच्या गुन्हेगारीतील  ज्वलंत प्रश्‍न निर्माण झाला आहे. असे गुन्हे भेदण्यासाठी व त्याची उकल करण्यासाठी पोलिस दलाला अद्यावत   तंत्रज्ञानासह अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्गही मोठ्या प्रमाणात लागणार आहे. सायबर गुन्हेगारी गेल्या पाच वर्षाहून अधिक काळापासून भेडसावत असताना महाराष्ट्र शासनाने या विभागाची गेल्या वर्षी स्थापना केल्याने गुन्हेगारांचे कमालीचे फावत असल्याचे अधोरेखित आहे.

सायबर गुन्हेगारीतून ई पेमेंट, एटीएम, ऑनलाईन खरेदी यातून दररोज लाखो रुपयांचा चुना लावला जात आहे. आज युवक, युवती, वृध्द बहुतेक एटीएम वापरत आहेत. सायबर गुन्हेगार बँकेतून बोलत असल्याचे खोटे सांगून शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात टार्गेट करुन सहजपणे पैसे उकळत (ट्रान्सफर) आहेत. अशा पध्दतीसह विविध माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घातलेला आहे. कोट्यवधी रुपयांचे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे वाढत असताना पोलिसांकडून उकल होण्याचे प्रमाण तोकडे आहे.