Thu, Nov 15, 2018 10:40होमपेज › Satara › बनावट नोटांचे सातारा कनेक्शन

बनावट नोटांचे सातारा कनेक्शन

Published On: Jun 13 2018 9:15AM | Last Updated: Jun 13 2018 12:41AMमिरज : शहर प्रतिनिधी 

येथील एका हॉटेलसमोर पाचशे रुपयांच्या सतरा आणि दोन हजार रुपयांच्या चार अशा एकूण 21 बनावट नोटा महात्मा गांधी चौकी पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी गौस गब्बार मोमीन (वय 21, रा. आझाद कॉलनी, भारतनगर, मिरज) याला अटक करण्यात आली. त्याला नोटा पुरवणार्‍या शुभम संजय खामकर (रा. नवीन एमआयडीसी, सातारा) याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

पोलिस हवालदार सुभाष पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. येथील  एका हॉटेलसमोरील बँकेजवळ गौस मोमीन हा सोमवारी रात्री उशिरा संशयितरीत्या फिरत होता. याबाबत पोलिसांना त्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याला रात्रीच ताब्यात घेतले. त्याच्याजवळ दोन हजार रुपयांच्या चार व पाचशे रुपयांच्या सतरा नोटा सापडल्या. 

त्या नोटा गौस याचा मित्र शुभम खामकर याने दुसर्‍याला खपवण्यासाठी दिल्या होत्या. त्या नोटा बनावट आहेत, हे माहीत असतानादेखील त्याने स्वतःजवळ बाळगल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याला आज अटक करण्यात आली. 

आज न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला तीन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी सातारच्या खामकर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सातार्‍याला रवाना झाले आहे.