Thu, Apr 25, 2019 03:59होमपेज › Satara › सातार्‍याचा पारा १३.९ अंशांवर

सातार्‍याचा पारा १३.९ अंशांवर

Published On: Dec 20 2017 1:44AM | Last Updated: Dec 19 2017 11:43PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसभर हुडहुडी भरत आहे. मंगळवारी सातारचा किमान पारा 13.9 अंशांवर, तर थंड हवेचे ठिकाण समजले जाणार्‍या महाबळेश्‍वरचा पारा 13 अंशांवर होता. 

गेल्या काही दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढू लागली आहे. दिवसभर थंडी जाणवत असल्याने नागरिकांना उबदार कपड्यांचा आसरा घ्यावा लागत आहे. मंगळवारी सातारचे कमाल तापमान 28.1, तर किमान तापमान 13.9 अंश सेल्सिअस होते. महाबळेश्‍वरचे तापमान 24.2 तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस होते. 

पुन्हा एकदा थंडीचे आगमन झाल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. थंडीमुळे  चहाचे ठेलेही रात्री उशिरापर्यंत चालू असल्याचे दिसत आहे. वाढत्या थंडीमुळे सायंकाळी 6 नंतर वर्दळ व वाहतूक कमी होत आहे. त्यामुळे रस्ते ओस पडू लागले आहेत. सायंकाळी शहर परिसरातील बाजारपेठेत लोकरी व उबदार कपड्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती. ही थंडी गहू हरभरा व अन्य पिकांसाठी पोषक असल्याचे कृषी अधिकार्‍यांनी सांगितले.