Wed, Jul 17, 2019 20:38होमपेज › Satara › धुळवडीला शेकडो बोकडांचा फडशा

धुळवडीला शेकडो बोकडांचा फडशा

Published On: Mar 03 2018 1:43AM | Last Updated: Mar 02 2018 11:01PMसातारा : प्रतिनिधी 

धुळवडीनिमित्त सातारा शहरासह जिल्ह्यात एका दिवसातच मटण व मासे बाजारपेठेत लाखोंची उलाढाल झाली. धुळवडीनिमित्त सातारा शहरासह जिल्ह्यातील मटण दुकानांवर मटण खरेदीसाठी पहाटेपासूनच झुंबड उडाली होती. दिवसभरात सुमारे 20 हजार कोंबड्या, शेकडो बोकडे व 2 टन माशांचा मटन खवय्यांनी फडशा पाडला. सातारा शहर परिसरासह जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील मटण दुकानासमोर नागरिकांनी पहाटेपासूनच लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. सातार्‍यातील मार्केट यार्ड परिसर, एस. टी. स्टँड परिसर, राजवाडा परिसर, गोडोली तळे परिसर नगरपालिका परिसरातील वरचा रस्ता तसेच मच्छी मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी दिसत होती.

बोकडाच्या मटनाचा दर 420 ते 480 रुपये प्रति  किलो असा होता. तर बॉयलर कोंबडीचे मटन प्रति किलो 160 ते 180 रुपये,  जिवंत देशी कोंबडा-कोंबडीचा प्रति किलो दर 320 ते 350 रुपये आहे. गतवर्षापेक्षा यंदा मटणाच्या दरात वाढ झाली असली तरीही मटण विक्री मात्र वाढ होत आहे. तसेच अनेकांनी बोकडाच्या मटनाला फाटा देत ‘स्वस्त आणि मस्त’ असलेल्या बॉयलरच्या मटनाला अधिक पसंती दिल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

धुळवडीला मटणाची मागणी वाढल्याने मटण विक्रेत्यांनी धांदल उडत होती. अनेक विक्रेत्यांनी दुकानात वाढीव कर्मचारी नेमले होते. तरीही मटण विक्रेत्यांची ही धांदल दुपारनंतर शिगेला पोहोचली होती. सायंकाळी उशीरापर्यंत मटण-चिकण विक्रेत्या दुकानासमोर गर्दी दिसत होती.  सातारा शहरातील मच्छी मार्केटमध्ये धुलवडीला मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली. धुलवडीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणावर माशांची आवक  झाली होती.

कटला, पापलेट, सुरमई, बांगडा, हलवा, रावस, कोळंबी, वारु, मरळ, रावस, आदी प्रकारचे मासे विक्रीसाठी मच्छी मार्केटमध्ये उपलब्ध होते. मासे खाणारे कटला व पापलेटलाच जास्त पसंती देत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मटण, चिकन, मासे व  मच्छी मार्केटमध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाली. धुळवड साजरी करण्यासाठी तळीरामांनी ढाबे, परमिट रुम बिअर बार, बिअर शॉपी, वाईन शॉपी दुकानावर गर्दी केली होती. शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने अनेकांनी घराबाहेर गर्द झाडीतही बेत करुन धुळवड साजरी केली.