होमपेज › Satara › पोलिसांकडूनच वडापाव खाऊन ‘तो’ पसार

पोलिसांकडूनच वडापाव खाऊन ‘तो’ पसार

Published On: Jan 03 2018 1:18AM | Last Updated: Jan 02 2018 11:16PM

बुकमार्क करा
सातारा : विठ्ठल हेंद्रे

तडीपारीतील गुंड कैलास नथू गायकवाड (वय 20, रा.नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा) हा शाहूपुरी पोलिस ठाण्यातून भुकेचे सोंग घेऊन पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याचे समोर आले आहे. भूक लागल्याचे सांगत वडापाव सटकवून तो बेड्यांसह परागंदा झाला असून, 24 तास उलटल्यानंतरही तो अद्याप सापडलेला नाही. कैलासवर हाफ मर्डरसह एकूण 9 गुन्हे दाखल असून 10 दिवसांपूर्वीच त्याला सातार्‍यातून तडीपार केले होते.  संशयित कैलास गायकवाड हा सातार्‍यातील रहिवासी असून त्याच्यावर हाफ मर्डरचा एक, मारामारीचे दोन व घरफोडीचे सहा असे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. दि. 22 डिसेंबर 2017 रोजी त्याला 1 वर्षासाठी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी तडीपार केले होते.

कैलास तडीपारीत असतानाच 1 जानेवारी रोजी तो सातार्‍यात एका बिअर बारमध्ये दारू पित असल्याची माहिती मिळाली. तत्काळ पोलिसांनी शिताफीने सापळा रचून वर्षाच्या पहिल्याच दिवशी तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कैलास गायकवाड याला ताब्यात घेतले होते. एलसीबीच्या पथकाने दुपारी 1 वाजण्याच्या  सुमारास ताब्यात घेतल्यानंतर कागदांचे सोपस्कार पार पाडून त्याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याला एलसीबीने शाहूपुरी पोलिसांकडे दिल्यानंतर त्याचा ताबा घेवून पोलिस ठाण्यात बेड्या घालून बसवण्यात आले. बेड्या घातल्यानंतर कैलासने भूक लागल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनीही कर्तव्याचा भाग म्हणून त्याला खाण्यासाठी वडापाव आणून दिला.

वडापाव खाण्यासाठी त्याच्या हातातील बेड्या पोलिसांनी मोकळ्या केल्या. याचदरम्यान, पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी इतर काही लोक आले. आलेल्या तक्रारदारांकडे पोलिसांचे लक्ष राहिल्याने हीच संधी कैलासने साधली. पोलिसांचे लक्ष नसल्याचे पाहून त्याने तेथून पाय काढून धूम ठोकली. तोपर्यंत आलेला जमाव शांत झाल्यानंतर कैलास गायकवाड नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. घाबरेघुबरे होवून पोलिसांनी शोध मोहीम घेतली असता तो परिसरात कुठेच नसल्याने पोलिसांची पुरतीच पंचायत झाली. घटनेचे गांभीर्य पाहून शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिसांनी वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली. एलसीबीच्या पथकाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेही चक्रावून गेले. ताबा दिल्यानंतर अवघ्या दोन तासात तडीपारीतील संशयित आरोपी रफूचक्कर झाल्याने एलसीबीच्या पथकाने पुन्हा त्याच्या शोधासाठी मोहीम आखली.