Wed, Jan 29, 2020 23:10होमपेज › Satara › महाबळेश्‍वरपेक्षा सातारा झाला थंड

महाबळेश्‍वरपेक्षा सातारा झाला थंड

Published On: Dec 31 2017 1:28AM | Last Updated: Dec 30 2017 10:58PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात किमान तापमानात झालेली लक्षणीय घट यामुळे सातारकरांना गेल्या 3 ते 4 दिवस रात्री थंडी अनुभवावयास मिळत आहे. शनिवारी थंड हवेचे ठिकाण समजल्या महाबळेश्‍वरचे किमान तापमान 13 अंश सेल्सिअसवर तर सातार्‍याचे तापमान 10.5 अंश सेल्सिअसवर गेले होते. यामुळे सातारा जिल्ह्यात कडाक्याची थंडी जाणवत असून, अवघे जनजीवन गारठून गेले आहे.

बाहेरील राज्यातून जिल्ह्यात थंड वारे प्रवाही असल्यामुळे थंडीचा कडाका वाढला असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत आहे.कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांना हुडहुडी भरत आहे. वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी पहाटे व रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. ही बोचरी थंडी आता नकोनकोशी वाटू लागली आहे. थंडीच्या कडाक्यामुळे भल्या सकाळी शाळा-महाविद्यालयात जाणार्‍यांची तसेच कामानिमित्त जाणार्‍या नागरिकांची तारांबळ उडत आहे. 

थंडीने वातावरणात फिरायला जाणार्‍यांची संख्याही दिवसेंदिवस रोडावत चालली आहे.  मात्र, गेल्या  3 ते 4  दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. स्वेटरसह उबदार कपडे घालूनच बाहेर  वावरावे लागत आहे. सातारा शहरातील कपडे दुकानांसह एस.टी. स्टँड, पंचायत समिती परिसरात कापड विक्रेत्यांकडे उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी होत आहे. ग्रामीण भागामध्येही थंडीचा कडाका वाढला असून गावोगावी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत गावाच्या पारावर शेकोट्याभोवती  चर्चा रंगू लागल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये ऊस तोडणी कामगारांच्या पालाभोवती थंडीमुळे पहाटे व रात्रीच्यावेळी शेकोट्या पेटलेल्या दिसून येत आहेत. 

शनिवारी सातारचे कमाल तापमान 29.7 अंश व किमान तापमान 10.5 अंश सेल्सिअस तर थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणार्‍या महाबळेश्‍वरचे कमाल तापमान 26.7 व किमान तापमान 13 अंश सेल्सिअस  होते.