Sat, Apr 20, 2019 17:52होमपेज › Satara › कृषी विभागाकडून वीज मंडळ धारेवर 

कृषी विभागाकडून वीज मंडळ धारेवर 

Published On: Jan 17 2018 2:04AM | Last Updated: Jan 17 2018 1:21AM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे  सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांची सुमारे 13 हजार कृषीपंपाची कनेक्शन प्रलंबित असल्याने  सदस्यांनी नाराजी दर्शवत वीज मंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढले. शेतकर्‍यांची सहनशीलता संपली असून त्यांचा रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही सदस्यांनी दिला. जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची सभा सभापती मनोज पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या सभागृहात संपन्न झाली. सभेस शंकर खबाले, आशिष आचरे, प्रतिक कदम, प्रकाश चव्हाण, रजनी भोसले, सुरेखा जाधव, दिपाली साळुंखे,  संगिता खबाले पाटील,  प्रियांका ठावरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी चांगदेव बागल व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सभेच्या सुरूवातीस तालुकानिहाय कृषी अधिकार्‍यांकडून आढावा घेण्यात आला. सन 2014 पासून जिल्ह्यातील शेतीपंपांची कनेक्शन प्रलंबित असल्याने महावितरणच्या कारभाराबाबत सदस्यांनी नाराजी दर्शवली. कृषी विभागामार्फत जिल्ह्याच्या 11 तालुक्यात कृषी सर्व्हीस प्रोव्हायडर ही नाविन्यपूर्ण योजना अंमलात आणली गेली असून तालुक्यात गट स्थापन झाले आहेत का नाहीत? याबाबतचा आढावा घेवून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे मनोज पवार यांनी सांगितले.

शासनाने  सौर कृषी पंप योजना अंमलात आणली यासाठी जिल्ह्यात 225 लाभार्थ्यांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. या योजनेसाठी लाभार्थ्यांचे सुमारे 50 प्रस्ताव प्राप्त झाले होते मात्र शासनाने ही योजना बंद केली असल्याने शासनाचे धोरण फसवे होते की काय? असा सवाल सदस्यांनी केला.
जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडे मोठ्या प्रमाणात शेततळी असून या तळ्यात मत्स्यपालनासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांना मत्स्यबीज व खाद्य कसे देता येईल याबाबत चर्चा करण्यात आली असून जिल्ह्यातील शेततळ्यांचा सर्व्हे करण्याच्या सूचना मनोज पवार यांनी कृषी अधिकार्‍यांना दिल्या.सभेत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, सामाजिक वनीकरण, राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेचा आढावा घेण्यात आला.