Sun, Nov 18, 2018 17:35होमपेज › Satara › अतिक्रमणांवर बुलडोझर

अतिक्रमणांवर बुलडोझर

Published On: Dec 20 2017 1:44AM | Last Updated: Dec 20 2017 12:03AM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

मुख्य मार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या अतिक्रमणांना सातारा नगरपालिकेने मंगळवारी दणका दिला. पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव विभाग तसेच शहर नियोजन विभागाने राबवलेल्या संयुक्त कारवाईत रविवार पेठ भाजी मंडई मार्गावरील 20 हून अधिक खोकी हटवण्यात आली. बुलडोझरच्या साहाय्याने पक्क्या अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात आली.
पोवईनाक्यावरील छत्रपती शाहू मार्केट यार्डजवळील भाजी मंडईच्या मुख्य प्रवेश मार्गापासून रविवार पेठेत जाणार्‍या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली होती.

त्यामुळे भाजी विक्रेत्यांवर पुणे-बंगळूर जुन्या हायवेवर भाजी विकत बसायची वेळ आली होती. भाजी मंडईच्या प्रवेशद्वारावर ग्राहक तसेच भाजी विक्रेत्यांच्या होणार्‍या गर्दीमुळे अपघाताचाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी पालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग, तसेच शहर नियोजन विभागाच्या वतीने  राबवलेल्या संयुक्त कारवाईत हातगाडे, पत्र्याची शेड्स तसेच खोकीधारकांवर कारवाई करण्यात आली. काही विक्रेत्यांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली.  

या कारवाईमुळे मंडईतील मुख्य रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला. तसेच भाजी विक्रेत्यांनाही पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध होऊन रस्ता खुला झाल्याने ग्राहकांनीही समाधान व्यक्त केले. कारवाईवेळी उपनगराध्यक्ष राजू भोसले, मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी कारवाईच्या ठिकाणी भेट देऊन कर्मचार्‍यांना सूचना केल्या. यावेळी शहर नियोजन विभागाचे श्रीकांत गोडसे, शैलेश अष्टेकर, सतीश साखरे, अतिक्रमण हटाव विभागाचे प्रशांत निकम आदी उपस्थित होते. दरम्यान, शिक्षक बँकेकडून तहसीलदार कार्यालयाकडे येणार्‍या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. या मार्गावर वाहतुकीची

सातत्याने कोंडी होत असते. त्यामुळे या परिसरातील अतिक्रमणांवरही कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. अतिक्रमणांवरील कारवाईत सातत्य हवे सातार्‍यातील अतिक्रमणांकडे बरीच वर्षे दुर्लक्ष झाल्याने  वाहतुकीचा कोंडमारा सुरु झाला आहे. भाजी मंडई तसेच व्यापारी पेठांवरील फुटपाथ विक्रेत्यांनी काबीज केले आहेत. नगरपालिकेकडून होणारी कारवाई तात्पुरती असून चार दिवसांनी पुन्हा अतिक्रमणे करु, असा सूर अतिक्रमण करणार्‍या काहीजणांकडून काढला जात आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांना दणका देवून अतिक्रमणे काढण्यात  नगरपालिकेने  सातत्य ठेवावे, अशी मागणी होत आहे.