होमपेज › Satara › वीस दिवसांत कसे खर्चायचे ३ कोटी?

वीस दिवसांत कसे खर्चायचे ३ कोटी?

Published On: Mar 11 2018 11:59PM | Last Updated: Mar 11 2018 10:06PMसातारा : प्रवीण शिंगटे

सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना विकासकामांसाठी दरवर्षी भरीव स्वरूपाचा निधी उपलब्ध होत असतो. मात्र, हा निधीच खर्च होत नसल्याचे भीषण वास्तव यावर्षीही समोर आले आहे. समाजकल्याण विभागाचाही तब्बल तीन कोटींचा निधी अद्याप खर्च झालेला नाही. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत म्हणजेच अवघ्या 20 दिवसांत आता  हा निधी खर्च करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. जि.प.च्या अनेक विभागातील या अखर्चित निधीचा क्रमश: स्वरूपात घेतलेला मागोवा आजपासून...

समाज कल्याण विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या 20 टक्के निधीतून अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांसाठी विकासात्मक योजना राबवल्या जातात. त्यासाठी 2017-18 मध्ये 3 कोटी 93 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र, त्यातील तब्बल 2 कोटी 93 लाख 36 हजार रूपयांचा निधी अखर्चित राहिला आहे. तर आतापर्यंत फक्‍त 99 लाख 67 हजार 967 रूपये निधी खर्च झाला आहे. उर्वरित सुमारे 3 कोटी रुपये मार्च महिना अखेरपर्यंत खर्च करण्याचे आव्हान  आहे. 

घरकुल योजनेसाठी 60 लाखांची तरतूद करण्यात आली होती. यामध्ये 23 लाख 45 हजार रूपये खर्च झाले असून 36 लाख 55 हजार निधी शिल्‍लक आहे. समाजमंदिर बांधकाम  व दुरूस्तीसाठी 90 लाख मंजूर निधीपैकी 32 लाख 97 हजार 76 रुपयांचा निधी खर्च झाला आहे. 62 लाख 2 हजार 924 रुपयांचा निधी शिल्लक आहे. जोडरस्त्यासाठी 75 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 25 लाख 11 हजार 564 रुपयांचा निधी खर्च झाला आहे. 66 लाख 76 हजार436 रुपयांचा निधी अद्यापही शिल्लक आहे.

पिको फॉल मशिनसाठी 5 लाख 78 हजार  रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी  96 हजार 480 रुपयांचा निधी खर्च झाला आहे. तर 62 लाख 2 हजार 924 रुपयांचा निधी शिल्लक आहे. घरघंटीसाठी 17 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 4 लाख 32 हजार 900 रुपये खर्च झाले आहेत. तर 12 लाख 67 हजार 100 रुपयांचा निधी  खर्चावाचून पडून आहे.

इयत्ता 5 वी ते 12 वीच्या मुलांना सायकलसाठी  3 लाख 2 हजार  रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी 13 हजार 680 रुपयांचा निधी खर्च झाला आहे. तर 1 लाख 53 हजार 320 रुपयांचा निधी शिल्लक आहे. मुलींच्या सायकलसाठी  3 लाख 2 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी 17 हजार 500 रुपयांचा निधी खर्च झाला असून 2 लाख 84 हजार 500 रुपये फक्‍त खर्च झाले आहेत. गजी नृत्यासाठी प्रोत्साहन देणे, गजी मंडळाचे संमेलनामध्ये 100 टक्के निधी खर्च करण्यात समाजकल्याण यशस्वी झाला असला तरी यावर्षी झालेले गजी संमेलन फ्लॉफ शो ठरला. 

मागासवर्गीय वस्तीतील समाज मंदिरांना सतरंजी पुरवणे, वसतिगृहांना सोयी सुविधा पुरवणे,  मागासवर्गीय वस्तीत दिवाबत्ती सोय करणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी या विषयाचे संगणक ज्ञान देणे, गुणवत्ताप्राप्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना  टॅब पुरविणे अशा कामांसाठी वर्षभराच्या कालावधीत 1 रूपयाही निधी खर्च झालेला नाही. 

कडबाकुट्टी यंत्र पुरवण्यासाठी 12 लाख रुपयांपैकी 1 लाख 39 हजार 500 रुपयांचा निधी खर्च झाला आहे. तर  10 लाख 60 हजार 500 रुपयांचा अद्यापही शिल्लक आहे. शेतीसाठी विद्युत पंप पुरविण्यासाठी 11 लाखांपैकी फक्‍त 54 हजार रुपये फक्त खर्च झाले आहेत. तर 4  लाख 6 हजार रुपयांचा निधी शिल्लक आहे.झेरॉक्स मशीनसाठी 29 लाखाची तरतुद करण्यात आली होती. त्यापैकी 4 लाख 53 हजार 600 रुपयांचा निधी खर्च झाला आहे. 24 लाख 46 हजार 400 रुपयांचा निधी अद्यापही शिल्लक आहे.