Thu, Jun 27, 2019 01:59होमपेज › Satara › सातारा जिल्हा परिषद करणार वीजनिर्मिती

सातारा जिल्हा परिषद करणार वीजनिर्मिती

Published On: Mar 25 2018 1:53AM | Last Updated: Mar 24 2018 11:34PMसातारा : प्रतिनिधी

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय समजल्या जाणार्‍या सातारा जिल्हा परिषदेच्या  दोन्ही इमारतीच्या छतावर सोलर पॅनल बसवून वीज निर्मिती करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेने महाऊर्जाशी करार केला असून लवकरच हे काम सुरू होणार आहे. दोन महिन्यात काम पूर्ण झाल्यानंंतर सातारा जिल्हा परिषद विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होवून महिन्याचे सुमारे 2 लाख 40 हजार म्हणजेच वर्षाचे सुमारे 30 लाख रुपयांचे वीज बिल वाचण्यास मदत होणार आहे. 

सातारा जिल्हा परिषदेत लघु पाटबंधारे विभाग, समाजकल्याण, प्राथमिक शिक्षण, लेखा, ग्रामपंचायत, सामान्य प्रशासन, ग्रामीण पाणी पुरवठा, आरोग्य, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, बांधकाम उत्तर व दक्षिण, कृषी, सामान्य प्रशासन, स्वच्छता व पाणीपुरवठा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यासह विविध विभाग आहेत या सर्व विभागात विजेवर चालणारी उपकरणे असल्याने  जिल्हा परिषदेला दर महिन्याला सुमारे 2 लाख 40 हजार रुपयांचे वीज  बील येत असते. त्यामुळे दरवर्षी जिल्हा परिषद प्रशासनाचा विजेवर सुमारे 30 लाख रुपयांचा निधी खर्च होत असतो. त्यामुळे जिल्हा परिषदेने दोन्ही इमारतीच्या छतावर सोलर पॅनल बसवून वीज निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत  स्थायी व सर्वसाधारण सभेमध्येही  मंजुरी घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या दोन्ही इमारतीवर सोलर पॅनेल उभारून त्याद्वारे सोलरफोटो व्होल्टाइक पॅनेलद्वारे वीजनिर्मिती केली जाणार आहे.  यामध्ये निर्माण झालेली वीज थेट महावितरणच्या ग्रीडला जोडली जाणार आहे.जिल्हा परिषद व वीज मंडळाच्या यंत्रणामध्ये एक टु वे मीटर (नेट मीटर) जोडला जाणार आहे. या वैशिष्टपूर्ण मीटरमध्ये  जिल्हा परिषदेकडून   महावितरणच्या ग्रीड ला जोडल्या जाणार्‍या  विजेची नोंद व महावितरणच्या ग्रीडमधून  जिल्हा परिषदेकडे येणार्‍या  विजेची नोंद घेतली जाणार आहे. जिल्हा परिषदेने वीज मंडळाकडून घेतलेली वीज (इम्पोर्ट) आणि ग्राहकाने वीज मंडळाला दिलेली वीज या फरकातून वीज देयके बनवली जाणार असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील यांनी सांगितले.

स्वत:च्या गरजेप्रमाणे वीज वापरून  निर्माण केलेली अतिरिक्त वीज झेडपीकडून मंडळाला विकता येणार आहे. दिवसा ही वीज फारशी वापरली जात नाही. अशी न वापरलेली वीज नेटमीटरिंगद्वारे महावितरणला विकता येणार आहे. यातून जिल्हा परिषदेमध्ये होणारे भारनियमन बंद होणार आहे. शिवाय विजेचे मासिक बिल  अत्यंत कमी प्रमाणात होणार असल्याचे जि.प.चे बांधकाम उत्तरचे कार्यकारी अभियंता एस.आर. पाटील यांनी सांगितले. 

सातारा जिल्हा परिषदेला वीज बिलासाठी दर महिन्याला लाखो रूपये खर्च होत होते. तसेच लाईट गेल्यानंतर जनरेटर सुरु करावयास लागत होता त्यामुळे जनरेटरच्या डिझेलसाठी  हजारो रूपयांची तरतुद करावी लागत होती. सौर पॅनलमुळे लाखो रूपयांची बचत होणार आहे. सौरपॅनल संदर्भात जिल्हा परिषदेने महाउर्जाबरोबर करार करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. दोन्ही इमारतीवर सौर पॅनल बसवण्यासाठी सुमारे 65 लाख रुपये खर्च केला असून प्रशासनाने यासाठी तरतूद केली आहे. लवकरच हा करार झाल्यानंतर हे काम महाऊर्जामार्फत करण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे 2 महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर सौरपॅनल तयार झाल्यानंतर जिल्हा परिषद विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे.
 

 

 

tags : Satara,news, Satara, Zilla, Parishad, Power ,Generation,