Mon, Apr 22, 2019 12:39होमपेज › Satara › पोलिसासह महिलेची फसवणूक

पोलिसासह महिलेची फसवणूक

Published On: Jul 22 2018 11:06PM | Last Updated: Jul 22 2018 11:06PMसातारा : प्रतिनिधी

आर्थिक फायद्याकरिता कमी व्याज दरात कर्ज मिळवून देतो, असे सांगून 1 लाख 24 हजार रुपयांची फसवणूक करून विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एका मुंबईकरावर गुन्हा दाखल झाला आहे. सातार्‍यातील एका वकिलाचेही तक्रारीत नाव असून त्या वकिलाने मुंबईकराची ओळख  करून देत महिलेला धमकी देऊन शिवीगाळ केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, धक्‍कादायक बाब म्हणजे सातारा पोलिस दलातील एका पोलिसाचीही या प्रकरणात फसवणूक झाली असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

नारायण मारुती चौधरी (रा.दादाभाई चाळ, लोअर परेल, मुंबई) व अ‍ॅड. शिवराज चंद्रकांत पवार (रा.शनिवार पेठ, सातारा)  या दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कराड तालुक्यातील एका महिलेने तक्रार दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार महिलेची सातार्‍यातील अ‍ॅड. शिवराज पवार यांच्याशी मार्च महिन्यात ओळख झाली. तक्रारदार यांना कराड येथे फ्लॅट घ्यायचा असल्याने त्यांना कर्ज हवे होेते. यावेळी अ‍ॅड.पवार याने मुंबईतील नारायण चौधरी हे ओळखीचे असल्याचे सांगून ते गोडबोले ट्रस्टच्या माध्यमातून कमी व्याज दरात कर्ज मिळवून देतात, असे सांगितले. तक्रारदार यांनी चर्चा केल्यानंतर शेअर्स व कमिशन असे एकूण 1 लाख 24 हजार रुपये देण्यास सांगितले. त्यानुसार 80 हजार आरटीजीएसद्वारे भरले व उर्वरित रक्‍कम रोख दिली.

या घटनेनंतर खूप दिवस वाट पाहिल्यानंतरही कर्ज मिळत नव्हते. प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे देवून कर्ज लांबणीवर जात होते. अखेर कर्ज मिळत नसल्याने तक्रारदार महिलेने चौधरी याला फोन लावला असता त्याने अपशब्द वापरुन महिलेचा विनयभंग केला. याबाबत ती महिला वकीलांना भेटली असता त्या वकीलानेही महिलेला दमदाटी करुन शिवीगाळ केली. या सर्व घटनेमुळे तक्रारदार महिलेने शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द तक्रार दिली आहेे.