Mon, Jun 17, 2019 02:15होमपेज › Satara › सत्ताधारी सातारा विकास आघाडी नगरसेवकांमध्येच हमरीतुमरी 

सत्ताधारी सातारा विकास आघाडी नगरसेवकांमध्येच हमरीतुमरी 

Published On: Aug 03 2018 1:38AM | Last Updated: Aug 02 2018 11:23PMसातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेतील सत्ताधारी सातारा विकास आघाडीतील नगरसेवकांमधील संघर्ष पराकोटीला पोहोचला. सदरबझारमधील अस्वच्छतेच्या कारणावरून नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या दालनातच आरोग्य सभापती यशोधन नारकर आणि  नगरसेवक वसंत लेवे व विशाल जाधव यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. एकमेकांच्या अंगांवर धावून जाण्याचा आणि बघून घेण्याची भाषा वापरल्याने नगरपालिकेत दिवसभर याचीच चर्चा रंगली होती. 

सातारा विकास आघाडीत गटबाजी  उफाळून आल्यावर काही दिवसांपूर्वीच आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना लक्ष घालावे लागले. नगराध्यक्षा आणि गटनेत्यांच्यात गट पडल्याने खासदारांनी दोन्ही गटांना कानपिचक्या दिल्या. त्यांना लोकसभा निवडणुकीची आठवणही करून दिली. मात्र, याचा साविआ नगरसेवकांना विसर पडल्याने खासदार पुढे जाताच मागे पुन्हा गटबाजीने साविआला ग्रासले. साविआतील नगरसेविकांमधील असलेली धुसफूस नगरसेवकांमध्येही सुरु झाली आहे. त्यामुळे एका गटातील नगरसेवक दुसर्‍या गटातील नगरसेवकांवर खार खावून आहेत. त्यातच टेंडरबाजीने ही गटबाजी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. सध्या कचराकुंडीमुक्‍त सातारा ही संकल्पना राबवली जात आहे. त्यामुळे त्या परिसरातील कचरा कुठे टाकायचा? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आरोग्य विभाग त्यासाठी घंटागाडीची व्यवस्था करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यासाठी वेळ लागणार असल्याने शहरातील कचर्‍याची समस्या जटिल बनली. त्यातच स्वच्छता ठेकेदार साशा कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने आगीत तेल ओतले जात आहे. 

नगराध्यक्षांच्या दालनात गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हमरीतुमरीचा प्रकार घडला. सदरबझारमध्ये कचर्‍याची समस्या निर्माण झाली असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्या परिसरातील नगरसेवक विशाल जाधव यांनी कचर्‍याने भरलेल्या ट्रॅक्टर नगरपालिकेच्या दारात ओतायला आणला. या प्रकाराने आरोग्य विभगात खळबळ उडाली. नगराध्यक्षांपर्यंत प्रकरण गेले. त्यांनी मुख्याधिकारी, आरोग्य सभापती, भाग निरीक्षकांना पाचारण केले. संबंधित अधिकारी, पदाधिकारी आल्यावर कचर्‍याच्या समस्येवर खल सुरु झाला. कचराकुंड्या उचलल्यामुळे प्रभागातील लोक ओरडायला लागले आहेत. कचराकुंड्या उचलण्यापूर्वी सांगितले का नाही? अशी विचारणा  विशाल जाधवांनी केली. कचर्‍याने भरुन आणलेला ट्रॅक्टर पाहून यशोधन नारकरही संतापलेले होते.

विरोधकांनी पालिकेच्या दारात कचरा टाकायला आणला असता तर समजू शकलो असतो. पण सत्‍ताधारी आघाडीतील नगरसेवकच असे कृत्य करत असेल तर काय म्हणायचं? कचर्‍याची समस्या होती तर सांगायचे होते. कॉम्पॅक्टर बंद होता. कचरा उचलण्यासाठी पर्यायी व्यवस्था करता आली असती, असे नारकर यांनी स्पष्ट केले. मात्र, जाधव यांनी काही ऐकून घेतले नाही. कॉम्पॅक्टर दुरुस्त करायची जबाबदारी साशा कंपनीवर आहे. कॉम्पॅक्टर बिघडला होता तर त्यांनी इतर वाहन उपलब्ध करायला हवे, असा वाद घालायला सुरूवात केली. नारकर यांना समजावून  सांगत होते. मात्र, जाधव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे नारकरही संतापले. साशा कंपनीत कुणाचे डंपर, ट्रॅक्टर, वाहने लागतात आणि कोण पैसे कमावतो हे माहित आहे. ज्याला सभापती व्हायचंय त्यांनी खुशाल व्हावं. मला माझी कारकीर्द बदनाम करायची नाही, असे नारकर यांनी सुनावले. त्यामुळे या वादात वसंत लेवे यांनी उडी घेतली. शब्दाने शब्द वाढल्याने वाद विकोपाला गेला आणि अंगावर धावून जाण्यापर्यंत प्रसंग गंभीर बनला. साविआ नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला. बघतो, दाखवतोच, सोडणार नाही, अशी भाषाही वापरली गेल्याने   उपस्थितांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीच परिणाम झाला नाही.