Wed, Apr 24, 2019 19:32होमपेज › Satara › कुशी येथील पाझर तलावाचे काम मार्गी

कुशी येथील पाझर तलावाचे काम मार्गी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

 लिंब : वार्ताहर 

दै. ‘पुढारी’ने आवाज उठवल्यामुळे कुशी, ता. सातारा येथील पाझर तलावाचे काम मार्गी लागले आहे. त्यामुळे या तलावात आता पाणी साठा होवून टंचाई दूर होणार असल्याचा विश्‍वास नागरिकांनी व्यकत केला आहे. दरम्यान, कुशी परिसरातील जनतेने दै. ‘पुढारी’ला धन्यवाद दिले आहेत. 1972 च्या दुष्काळात या पाझर तलावाचे काम करण्यात आले. तलावाचे काम करतेवेळी भिंतीलगत सांडवा न काढल्याने तलाव पूर्ण भरून भिंतीवरून पाणी वाहू लागले. भरलेला तलाव फुटण्याची शक्यता असल्याने शासकीय अधिकारी व ग्रामस्थांनी तलावातील पाणी वाहून जाण्यासाठी चर काढला. त्या चरातून पाणी वाहून जात जात भिंतीला मोठी चर पडून तलावातील सर्वच पाणी वाहून गेले. त्यानंतर या तलावाची पुन्हा दुरुस्ती केली परंतु त्या तलावात पाणी साठले नाही . 

2012-13 मध्ये शासकीय यांत्रिक विभागामार्फत नव्याने तलावाच्या आतील भागात चर काढत दुरुस्ती करत पिचींगही केले, त्यानंतरच्या पावसाने हा तलाव भरत होता परंतु तो हळूहळू कमी होत होता. आता तर चालू वर्षी पावसाने भरलेला अर्धा तलावही दिवाळीनंतर काही दिवसातच आटल्याने भविष्यात कुशी गावाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची परिस्थिती होती. याबाबत कुशी ग्रामस्थांनी पाझर तलाव दुरुस्तीची मागणी केली होती. याबाबत दै. ‘पुढारी’नेेही या पाझर तलावाच्या दुरुस्तीबाबत आवाज उठवला होता.  

त्यानंतर आ. शिवेंद्रराजे भोसले तसेच सातारा पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत यांच्या माध्यमातून डीपीटीसीमधून पाझर तलाव दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला. या निधीमधून कार्यकारी अभियंता रणजित ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली तलावाच्या भिंतीलगत नव्याने पिचिंग करण्यात येणार आहे. तसेच सुमारे 15 फूट खोल जलरोधी चर काढून त्यामध्ये 400 मायक्रोनचा प्लॅस्टिक पेपर वापरण्यात येवून गळती रोखण्याबाबत उपाययोजना करण्यात आली आहे. तसेच तलावाच्या भिंतीची साफसफाई करण्याचे काम सध्या सुरु आहे.  हे काम दै. ‘पुढारी’च्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागल्याने ग्रामस्थांमधून दै. ‘पुढारी’चे अभिनंदन होत आहे. 
 


  •