Tue, May 21, 2019 18:09होमपेज › Satara › पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेचा बिगुल वाजला

पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेचा बिगुल वाजला

Published On: Feb 14 2018 2:56AM | Last Updated: Feb 13 2018 10:15PMसातारा : प्रतिनिधी

यावर्षीच्या दहावी व बारावीच्या परीक्षा अजूनही सुरू झाल्या नसून अन्य शालेय परीक्षांसाठीही बराच अवधी असला तरी पहिलीच्या पुढील वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेचा मात्र आत्ताच बिगुल वाजला आहे. त्यानुसार मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत शाळांमधील 25 टक्के  जागांवर वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश दिला जाणार आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील 234 शाळांमधील 2463 जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पालकांना 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे.वंचित व दुर्बल घटकातील  पालकांच्या मुलांना खासगी विना अनुदानित, कायम विना अनुदानित आणि  स्वयं अर्थसहाय्यीत शाळांमधील 25 टक्के जागांवर पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जाईल.

त्यासाठी 10 ते 30 जानेवारीदरम्यान शाळा नोंदणी करण्यात आली.अल्पसंख्यांक शाळा वगळता 234 शाळांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये    जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव  आहेत. या जागा भरण्यासाठी शनिवारपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी दिली. पहिल्या दिवशी एकही  अर्ज प्राप्त झाला नाही. अर्ज भरण्याची प्रक्रिया 28 फेब्रुवारीपर्यंत असेल. त्यानंतर एनआयसीतर्फे लॉटरी पध्दतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. या वर्षी वंचित व दुर्बल घटकांबरोबरच विधवा, परित्यक्तांचे पाल्य, अपंग व अनाथ विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात येणार आहे. 
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रवेश लॉटरी पध्दतीने निश्‍चित केला जाईल.

संबंधित शाळेत पालक प्रवेशासाठी गेल्यानंतर त्या शाळेने सबळ कारण न देता प्रवेश नाकारला तर पालकाला त्रिस्तरीय समितीकडे तक्रार करता येईल. या समितीत गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकार्‍यांचा समावेश आहे. मोफत प्रवेशासाठी संंबंधित शाळेस अनुदान मिळते.त्यामुळे शाळांनी पालकांकडून पैसे वसूल केले तर अशा शाळांवर कारवाई होणार आहे.

प्रवेश नाकारल्यास शाळांची मान्यता रद्द

प्रवेश अर्जासोबत पालकांना 10 शाळांच्या नावांचा पर्याय भरता येणार आहे. घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांना  प्रवेश देण्यात येणार आहेत. प्रवेश अर्ज भरताना पालकांनी चुकीच्या माहितीच्या आधारे प्रवेश घेतला तर संबंधित पालकांविरूध्द कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सबळ कारण न दाखवता विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्यात आला तर अशा शाळांची मान्यता रद्द करण्याची कारवाई होईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी एक लाखाच्या  आत उत्पन्न असल्याच्या दाखला सादर करणे आवश्यक आहे.


मोबाईल अ‍ॅप्स

प्रवेश प्रक्रियेसाठी लवकरच मोबाइल अ‍ॅप्स लाँच होणार आहे. हे अ‍ॅप्स तयार करण्याचे काम सुरू आहे. अ‍ॅप्स तयार झाल्यानंतर पालकांची चांगली सोय होणार आहे.सद्य:स्थितीत ऑनलाईन अर्ज केल्यावर पालकांच्या  मोबाईलवर प्रवेश प्रक्रियेविषयी संदेश पाठवण्यात येणार आहेत.