Thu, Jul 18, 2019 02:06होमपेज › Satara › सातारा-स्वारगेटसाठी २४ रु.चा जादा भुर्दंड

सातारा-स्वारगेटसाठी २४ रु.चा जादा भुर्दंड

Published On: Jun 17 2018 1:38AM | Last Updated: Jun 16 2018 10:33PMसातारा : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एस.टी. तिकिटाची 18 टक्के दरवाढ लागू केल्यामुळे  सातारा, पुणे व मुंबईसह अन्य मार्गावरील प्रवास महागला असून स्थानिक प्रवाशांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. भाडेवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. या दरवाढीमुळे आता सातारा-स्वारगेट साध्या बससाठी 24 व निमआराम बससाठी 25 रूपये  तर मुंबईसाठी 51  रुपये जादा मोजावे लागणार आहेत. दरम्यान, शिवशाहीचा प्रवासही महागला आहे.

नव्या दरवाढीमध्ये तिकिटाची भाडे आकारणी 5 रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. आठ रुपये तिकिटाऐवजी आता 10 रुपये तिकीट आकारले जाणार आहे.एसटीचे दर खासगी वाहतुकीपेक्षा जादा आहेत. एसटीचे  साध्या बसचे दर व कंसात निमआराम बसचे दर असे, सातारा - कराड 75 (100 रुपये), सातारा - कोरेगाव 35 (45), सातारा -फलटण 90 (120),  सातारा -वाई 45 (60), सातारा -पाटण 90 (120), सातारा -दहिवडी 100 (130), सातारा-वाई-महाबळेश्‍वर 85 (110), सातारा -मेढा-महाबळेश्‍वर 70 (90), सातारा - मेढा 30 (40), सातारा -पारगाव खंडाळा 60 (80). सातारा -वडूज 85 (110), सातारा -मुंबई 335 (455), सातारा -स्वारगेट 130 (175), सातारा -कोल्हापूर 165 (225), सातारा -सांगली 165 (225), सातारा -सोलापूर 315 (425), सातारा -बोरिवली 360 (485), सातारा -रत्नागिरी 300 (405), सातारा-अक्कलकोट 360 (485), सातारा - नाशिक 395(535) रुपये प्रवाशांना मोजावे लागणार  असल्याची माहिती विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी दिली.

शिवशाहीला सातारा स्वारगेटसाठी 171 रूपये होते ते दर आता 200 रुपये झाले. तर मुंबईसाठी 451 रुपये होते तो दर आता 530 रुपये झाला आहे. तिकीट दर वाढवले त्या बदल्यात प्रवाशांना सोयी सुविधा मिळणे गरजेचे आहे. कारण अनेक बसेसच्या खिडक्या तुटलेल्या आहेत, दरवाजे व खिडक्यांचा मोठा आवाज, एसटीची वेळोवेळी स्वच्छता नसणे, प्रवासी सीट फाटलेल्या स्थितीत आहेत. प्रथमोपचार पेट्या गायब, लाईटची व्यवस्था नसल्याने बहुतांश बसमधील बल्ब व ट्यूबा गायब असतात. बसच्या इंजिनमधील ऑईल गळती, धुराचे प्रमाण जास्त असे विविध प्रश्‍न समोर येत आहेत. नादुरूस्त  बसेस रस्त्यावर धावत असल्यामुळे  बसेस बंद पडण्याचे प्रकार अनेकदा घडत असल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.  गरीबांचा रथ म्हणून ओळखल्या जाणार्‍या एसटी बसेसची भाडेवाढ करण्यात आली असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे.