Tue, Mar 19, 2019 03:12होमपेज › Satara › सोनगाव येथील कचरा डेपोत  घाण टाकल्यास चमडे काढू

सोनगाव येथील कचरा डेपोत  घाण टाकल्यास चमडे काढू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सोनगाव कचरा डेपोत मिथेनचा साठा निर्माण झाल्याने त्या ठिकाणी स्फोट होण्याची शक्यता आहे. कचरा प्रकल्पासाठी दिलेल्या जागेचा दुरुपयोग करून त्या ठिकाणी कचरा डेपो केल्याने सातारा पालिकेने ग्रामस्थांची फसवणूक केली आहे. नगरपालिकेने चार महिन्यांत उपाययोजना न केल्यास कचरा डेपोला टाळे ठोकणार. सातारा शहरालगतच्या ग्रामपंचायतींनी कचरा डेपोत घाण टाकण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांचे चमडे काढू, असा इशारा सोनगाव ग्रामस्थांनी दिला. दरम्यान, जुलैपर्यंत प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी दिले.

सातारा नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आरोग्य विभाग तसेच सोनगाव ग्रामस्थांची बैठक पार पडली. बैठकीस मुख्याधिकारी शंकर गोरे, अ‍ॅड. अंकुश जाधव, आरोग्य अधिकारी राजेंद्र कायगुडे, पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते. शंकर गोरे म्हणाले, कचरा डेपो सुमारे 30-35 वर्षांपासून त्या ठिकाणी  असून सध्या सुमारे 2 लाख टन कचरा साचला आहे. कचर्‍यामुळे समस्या निर्माण झाल्या असल्या, तरी त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न नगरपालिका करत आहे.  सोनगाव ग्रामस्थांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.  

आक्रमक झालेल्या सोनगाव ग्रामस्थांनी व्यथा मांडल्या. अ‍ॅड. अंकुश जाधव म्हणाले, कचरा निर्मूलन करण्यासाठी किंवा प्रकल्प उभारण्यासाठी सोनगावची जमीन देण्याचा करार झाला.   पण त्याठिकाणी कचरा डेपो तयार केला. त्याठिकाणी सातत्याने आग लागत असल्याने निर्माण होणारा वायू आरोग्यास हानिकारक आहे.  इतर ग्रामपंचायतींच्या गाड्या थांबवाव्यात. घनकचरा प्रकल्प पूर्वी तयार केले असते तर ही वेळ आलीच नसती. 

ग्रामस्थ म्हणाले, आम्हाला हक्‍काची शुध्द हवा हवी. कचरा डेपोत अर्भक पुरली जातात.  संरक्षण नसल्याने खून करुन माणसे टाकली जातात. भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. सोनगावची ओळख ‘कचरा डेपो’ अशी झाली आहे. किती दिवसात उपायोजना करणार त्याची मुदत द्या. पावसाळ्यात रोगराई पसरते. धुरामुळे कॅन्सरचे रुग्ण वाढले. आरोग्य सभापतींनी चार दिवसांची मुदत मागूनही काहीच केले नाही. उपाययोजना करायच्या नसतील तर त्याठिकाणी कचरा टाकू नका. सोनगावचा कचरा डेपो कायमस्वरुपी बंद करा.

गावाने नगरपालिकेला कचरा प्रकल्पासाठी जागा दिली असताना दुसर्‍या ग्रामपंचायती कचरा टाकण्यास कशा येतात? यापुढे तसे झाल्यास संबंधितांचे चमडे काढू. सातारा स्वच्छ करुन आमच्या उरावर कचरा कशाला? तत्काळ कार्यवाही करा अन्यथा मुलाबाळांसह कचरा डेपोवर टाळे ठोक आंदोलन करणार, असा इशारा सरपंच पांडुरंग नावडकर, योगेश नावडकर, संतोष मुळीक, महेश बाबर, संदीप सपकाळ, सुमीत मुळीक व ग्रामस्थांनी दिला.  

नगराध्यक्षा सौ. माधवी कदम म्हणाल्या, सोनगाव ग्रामस्थांना होत असलेल्या त्रासाकडे नगरपालिकेला जाणीव आहे. कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून 16 कोटींचा घनकचरा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. प्रचंड मोठे काम असल्याने त्याला वेळ लागणार असला तरी कचरा डेपोतील धूर बंद करण्यासाठी  त्याठिकाणी बोअरवेल काढून पाईपलाईन केली जाईल. नगरपालिकेकडून टँकरची तात्पुरती व्यवस्था केली जाईल. सोनगाव कचरा डेपोचा प्रश्‍न जुलैपर्यंत मार्गी लावला जाईल.

नागरिकांनी आंदोलनाच्या मार्गाचा अवलंब न करता सहकार्य करावे, असे आवाहनही  त्यांनी केले. पोलिस निरीक्षक जाधव यांनीही कायदा व सुव्यवस्था राखण्याची विनंती केली. यावेळी भाजपचे गटनेते धनंजय जांभळे, मिलिंद काकडे, भाग निरीक्षक रणदिवे, यादव, टोपे,  ग्रामस्थ उपस्थित होते.
 

 

 

tags ; Satara,news,Songaon,garbage, depot,village, fraud,


  •