होमपेज › Satara › शिरवळ झोनिंगमधील रस्त्यामुळे शेतीचे विभाजन

शिरवळ झोनिंगमधील रस्त्यामुळे शेतीचे विभाजन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी 

शिरवळ झोनिंगमधील रस्त्यामुळे गट नं.  910 ते 931 पर्यंतच्या 20 ते 25 गटधारक शेतकर्‍यांच्या जमिनीचे  विभाजन होणार असून हा शेतकरी देशोधडीला लागणार आहे. रस्त्याला आमचा विरोध नाही मात्र शेतकर्‍यांच्या जमिनीचे विभाजन टाळून तो व्हावा अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. याबाबत विठ्ठल कबुले यांच्यासह शेतकर्‍यांनी एक निवेदन प्रसिध्दीस दिले असून आम्हा गरीब शेतकर्‍यांवर होणार्‍या अन्यायास वाचा फोडून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, दि. 30 मार्च 2017 रोजी प्रसिद्ध झालेल्या शिरवळ (सातारा) झोनिंगमध्ये जो रस्ता दाखवण्यात आला आहे त्या रस्त्यामुळे गट नं.  910 ते 931 पर्यंतच्या 20 ते 25 गटधारक शेतकर्‍यांचे दोन-दोन गटामध्ये विभाजन झालेले आहे.

दोन लहान तुकड्यांमध्ये विभाजन झाल्याने जमिनीमधून पाहिजे तसे उत्पन्न निघणार नाही. गटाच्या मधोमध रस्ता गेल्याने लहान तुकड्यांची वहिवाट करताना रस्ता ओलांडून बी-बियाणे, अवजारे, बैले,  गाड्यांचीही रस्त्यावरुन अलिकडे पलिकडे ने-आण करावी लागणार आहे. रस्त्यावरुन ट्रक, कार, मोटर्स टू व्हीलर्स यांची वाहतूक चालू राहणार  आहे. यामुळे रस्ता क्रॉस करताना बी -बियाणे, औजारे यांची वाहतूक करताना अपघात संभवतो. त्यामुळे शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांस  धोका संभवतो. याच जमिनीवर उत्पन्नामुळे आमचे संसार चालतात. जमिनीच्या विभाजनामुळे उत्पन्न घटून आमची बायका मुले उघड्यावर पडतील. संसार देशोधडीला लागण्याचा धोका आहे. 

हाच रस्ता गट नं. 910 ते 931 गटाच्या दक्षिण बाजूने म्हणजेच ओढ्याच्या बाजूने केल्याने वरील गटांचे विभाजन होणार नाही. एका बाजूस रस्ता व दुसर्‍या बाजूस संपूर्ण गट यामुळे गटाचे विभाजन न होता उत्पन्न कायम राहील. जमिनी वहिवाटण्यास सोयीस्कर होणार आहे. गट नं. 910 ते गट नं 931 पर्यंतच्या गटाच्या उत्तरेकडील बाजूस सरबांध आहे. गट नं. 598, 599, 931 पर्यंत जो रस्ता तोच जर गट नं. 932 व गट नं. 929, 928, 927 ते गट नं. 910 यांच्या सरबांधातून नेण्यास आमची हरकत नाही. गट नं. 932 व गट नं. 929 ते गट नं. 910, 882 या सर्व गटाची समसमान जमीन  रस्त्यासाठी घेण्यात यावी. म्हणजे वरील गट धारकांचे समसमान नुकसान होईल.  याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा व आम्हावरील अन्यायास वाचा फोडून दाद देण्यात यावी, अशी मागणी  विठ्ठल कबुले यांच्यासह नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. 
 


  •