Thu, Sep 20, 2018 12:14



होमपेज › Satara › ‘पुढारी एज्युदिशा’ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक हब : जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल 

‘पुढारी एज्युदिशा’ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक हब : जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल 

Published On: Jun 08 2018 5:44PM | Last Updated: Jun 08 2018 5:20PM



सातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात दै. ‘पुढारी’ आयोजित ‘पुढारी एज्युदिशा’ या आगळ्यावेगळ्या शैक्षणिक प्रदर्शनाबद्दल ऐकूण मी आश्‍चर्यचकित झाले. पुढारी एज्युदिशाने दहावी तसेच बारावीतील विद्यार्थ्यांसाठी करियरचे अनेक पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करुन दिले आहेत. अनेक नामवंत शिक्षण संस्थांच्या सहभागामुळे ‘पुढारी एज्यु दिशा’ शैक्षणिक हब झाले आहे. वृत्तपत्र क्षेत्रात आघाडीवर असणार्‍या दै. ‘पुढारी’चे हे काम ‘पॉझिटिव्ह’ आणि प्रोडक्टिव्ह आहे. त्याचा विद्यार्थ्यांना नक्की लाभ होईल, असे गौरवोद्गार सातार्‍याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी काढले.

संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रेझेंट ‘पुढारी एज्युदिशा २०१८’ या शैक्षणिक प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते तसेच दै. ‘पुढारी’चे सहाय्‍यक सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, दै. ‘पुढारी’चे न्यूज ब्युरो चीफ हरीष पाटणे, जाहिरात विभागप्रमुख नितीन निकम, संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. डॉ. पी. बी. कुलकर्णी, करिअर मार्गदर्शक, पीसीईटी तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे प्रा. विजय नवले, विश्‍वकर्मा युनिव्हर्सिटीचे एचओडी प्रा. राधाकृष्ण बटुले, चाटे शिक्षण समूह सातारा विभागाचे राजेंद्र घुले,  पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळाचे डॉ. व्ही. एन. गोहोकर, पुण्याच्या सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्‍स्‍टिट्‍यूटच्‍या प्रा. गीता दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

श्‍वेता सिंघल म्हणाल्या, ‘पुढारी एज्युदिशा हा अतिशय अभिनंदनीय असा उपक्रम आहे. दहावी तसेच बारावीनंतर काय करायचे, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही सतावत असतो. पण एकाच छताखाली नामवंत शैक्षणिक संस्थांमध्ये सुरु असलेल्या अनेक कोर्सेसची माहिती मिळणे, हे सातार्‍यातील विद्यार्थ्यांचे मोठे भाग्य आहे. केवळ माहितीच नव्हे तर करियरसंबंधी मार्गदर्शन व समुपदेशनही केले जात आहे. अलिकडच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ डॉक्टर्स आणि इंजिनियर्स न होता इतर क्षेत्रातील कोर्सेसकडेही लक्ष दिले पाहिजे. आवड असणार्‍या क्षेत्राला प्राधान्य दिले पाहिजे. केवळ चाकोरीबध्द शिक्षण न घेता त्यासोबत कौशल्यावर आधारित शिक्षणही घेतले पाहिजे.'

'शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर रोजगार मिळवून देतील असे छोटे-मोठे कोर्सेसही केले पाहिजेत. पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बर्‍याच ठिकाणी संधी उपलब्ध होते. नोकरीबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात आदराची भावना असली पाहिजे. सन्मान असला पाहिजे. तरच तुम्ही यशस्वी होऊ शकाल. कोणतेही क्षेत्र निवडताना दैनंदिन अभ्यास बंद करु नका. तुमच्यासाठी अनेक पर्याय खुले राहिले पहिजेत. समाजाशी संपर्क ठेवला तर रोजच्या समाजातील बदलाचे ज्ञान तुम्हाला होईल. पालक व गुरुजन तुमचे भविष्य चिंतत असतात. त्यांच्याइतकी काळजी समाजातील कुठलाच घटक घेऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या सल्ल्यानुसार स्वत:ला पेलेल अशी विद्याशाखा निवडा. अभ्यासाबरोबरच एखादे साप्ताहिक, मासिकाचे वाचन ठेवा. सामान्य ज्ञान वाढवा. प्रत्येकाने किमान अर्धा तास वृत्तपत्र वाचले पाहिजे. विद्यार्थ्यांनी वृत्तपत्र शेवटच्या पानापासून संपादकीय पानापर्यंत अशा पध्दतीने वाचले पाहिजे,' असेही सिंघल म्‍हणाल्‍या.  

‘पुढारी एज्युदिशामध्ये शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असणार्‍या शिक्षण संस्थांचे अनेक स्टॉल्स आहेत. खरंतरं, सरकारी नोकरींची माहिती देणारा स्टॉल याठिकाणी हवा. जिल्ह्यात नुकतीचं आर्मी आणि एअरफोर्स रिक्रुटमेंटची भरती झाली. त्यामध्ये जिल्ह्यातील शेकडो मुलांची निवड झाली. बेरोजगारांचे मेळावेही घेतले जातात. त्याची माहिती अशा स्टॉलवरुन देता येईल. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठवू न शकणार्‍या पालकांनी त्यांच्या मुलांना किमान सातार्‍यात शिक्षण दिले पाहिजे,' असे आवाहनही श्‍वेता सिंघल यांनी केले. 

राजेंद्र मांडवकर म्हणाले, ‘पुढारी एज्यु दिशाची साखळी १३ वर्षापूर्वी कोल्हापूर, सांगली, सातारा अशी सुरू झाली. माझे गुरु जगदीश खेबुडकर सांगायचे गीत रचण्यापूर्वी शब्द माझ्याभोवती रुंजी घालायचे. नेमके शब्द वेचून मी गीत रचायचो. त्याप्रमाणे कोर्सेसच्या गर्दीत विद्यार्थ्यांना यथायोग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पुढारी एज्युदिशातून विद्यार्थ्यांना शक्य तेवढे देण्याचा प्रयत्न आहे. कोणतीही विद्याशाखा निवडण्यापूर्वी संबंधित मान्यवरांच्या आयोजित व्याख्यानांचा लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी पालक व गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली करियर निवडावे, असेही राजेंद्र मांडवकर यांनी सांगितले.

हरीष पाटणे म्हणाले, 'सर्वाधिक खपाचे लोकप्रिय दैनिक पुढारीने समाजावर नेहमीच गारुड केले आहे. ‘पुढारी’ आणि प्रशासन यांच्यात आपुलकीचे नाते आहे. समाजिक प्रश्‍नांवर आवाज उठवताना ‘पुढारी’ची लेखणी कधी थांबली नाही. ‘पुढारी’ने समाजातील कष्टकरी, शोषित, उपेक्षित घटकांचे प्रश्‍न अतिशय संवेदनशीलपणे हाताळले आणि सोडवले. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव तसेच व्यवस्थापकीय संचालक योगेशदादा जाधव यांनी लोकहिताचे अनेक नाविन्‍यपूर्ण उपक्रम राबवले असून उदंड प्रतिसाद मिळत आहे. पूर्वीच्या गुरुकूल शिक्षण पध्दतीनंतर शिक्षण क्षेत्रात बदल होत गेले. करिअर निवडताना विद्यार्थ्यांना अंधारात चाचपडावे लागत होते. अनेक पिढ्या याच अंधारात ठेचकाळल्या.  मार्गदर्शक, गुरु नसताना काहींना करियर करण्याचा मार्ग सापडला. पण, करियरची वाट चोखाळता न आलेल्या बर्‍याच जणांच्या वाट्याला निराशा आली. या सर्व परिस्थितीचा विचार करुन नव्या पिढीला एकाच छताखाली सर्व कार्सेसची माहिती देण्यासाठी ‘पुढारी एज्यु दिशा’ हा उपक्रम राबवण्यात आला. कोल्हापूर तसेच सांगलीनंतर सातार्‍यात या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. दहावी तसेच बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या करियरची वाट चोखाळण्यापूर्वी ‘पुढारी एज्युदिशा’तील मातीचा गंध घेत आयुष्य सुगंधित करावे. ‘पुढारी एज्युदिशा’तून अचूक मार्गदर्शन घेऊन करियरची नवी वाट चोखाळावी' असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाहिरात प्रतिनिधी मयुरेश एरंडे यांनी केले. नितीन निकम यांनी आभार मानले.  यावेळी शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.