Thu, Apr 25, 2019 21:24होमपेज › Satara › सावधान, वीज कोसळतेय यमदूत बनून

सावधान, वीज कोसळतेय यमदूत बनून

Published On: Apr 10 2018 1:13AM | Last Updated: Apr 09 2018 11:37PMसातारा : संजीव कदम 

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने तिघांचे बळी घेतले आहेत. पावसात कोसळणारी ही वीज जीवावर उठत आहे. विशेषत: शेतकर्‍यांसाठी ही वीज धोकादायक असून त्यापासून खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कुठे ना कुठे अवकाळी पावसाचे थैमान सुरूच आहे.  या पावसात लखलखाट करणारी वीज यमदूत बनूनच चमकू लागली आहे. अनेकांच्या जीवावर उठणार्‍या या विजेबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये आजही भीती अन् कुतूलही आहे. उन्हाळ्यात कोसळणार्‍या वळीव पावसाप्रमाणे अवकाळीच्या पावसातही या विजेचा थयथयाट सुरु आहे.

या दोन्ही पावसात कोसळणारी ही वीज कित्येकांचा जीव घेऊन जाते. अलिकडे तर वीज पडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. तज्ञांच्या मते वीज केव्हाही, कोठेही पडू शकते. वीज पडण्यामागचे शास्त्रीय कारण सांगितले जाते. असे असले तरी या विजेमुळे अनेकांना हकनाक जीव गमवावा लागत आहे.  गेल्या दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने थयथयाट केला असून या पावसात कोसळलेल्या विजेमुळे आदिनाथ दिनकर मोरे (वय 32, रा. सोनगाव, ता. जावली), गणपत  नारकर (वय 43, मंगळवार पेठ, सातारा) व भूषण अनिल सावंत (वय 17 रा. काळचौंडी, ता. माण) यांना मृत्यूला कवटाळावे लागले असून त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सातार्‍यातील मंगळवार पेठेत राहणार्‍या गणपत नारकर हे तर महाबळेश्‍वरला लग्‍नासाठी जाताना वाटेत लघुशंकेसाठी थांबले असताना वीज काळ होऊन त्यांच्यावर कोसळली अन् त्यांना जीवाला मुकावे लागले. काळचौंडीतही अशीच जीवघेणी वीज कोसळली. घराशेजारील भिंतीवर अमोल आबा सावंत (वय 19) आणि भूषण अनिल सावंत (वय 17 ) हे  दोघे गप्पा मारत बसले होते. नेमक्या त्याचवेळी अवकाळी पावसाची सुरूवात झाली. या पावसात विजेचा लखलखाट सुरू होता. मात्र, त्या दोघांनाही हीच वीज आपल्या जीवावर उठणार असल्याची पुसटशी कल्पनाही नव्हती. अचानक वीज कोसळल्याने खाली पडून ते दोघे बेशुद्ध झाले.

त्यांना म्हसवड येथील रुग्णालयात दाखल केले असता भूषण सावंत यांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांनी विजेच्या संकटाची जाणीव करून दिली आहे. अशा घटना वळीव व अवकाळी पावसाच्या वेळी सर्रास घडू लागल्या आहेत. त्यामुळे काही  कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. घरातील कर्त्याला काळ हिरावून नेत आहे. त्यामुळे नागरिकांनी या विजेचे गांभीर्य लक्षात घेवून विजेपासून बचाव कसा करता येईल, यासाठी काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. 

विजेचे आकर्षण हे प्रामुख्याने उंच वृक्ष, पाणी याकडे असल्यामुळे झाडांवर, उंच इमारतीवर वीज कोसळण्याचे प्रकार अधिक घडत असतात. या विजेपासून संरक्षण करण्यासाठी शासकीय पातळीवरही हरतर्‍हेने जागृती केली जात असली तरी नागरिकांनीच याबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्याद‍ृष्टीने नागरिकांना विशेषत: शेतकर्‍यांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. 

 

 

 

tags : Satara,news, Rain, befall, power, Dangerous,