Thu, Apr 25, 2019 13:38होमपेज › Satara › सातारा-पुणे शटल सेवा बंद पाडू : आ. शिवेंद्रराजे

सातारा-पुणे शटल सेवा बंद पाडू : आ. शिवेंद्रराजे

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 17 2018 8:54PM

बुकमार्क करा
परळी  : वार्ताहर

परळी खोर्‍यात वारंवार एस.टी. बसेस बंद पडतात. बसेस वेळेवर सोडल्या जात नाहीत, असा तक्रारींचा पाढा वाचत आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी एस.टी. महामंडळाच्या कार्यालयात जाऊन विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांना आपल्या कारभारात सुधारणा करा, अन्यथा सातारा-पुणे शटल सेवा आम्ही प्रवाशांना सोबत घेऊन बंद पाडू, असा इशारा दिला.

कास पठार, परळी खोरे, कुसवडे, भाटमरळी, आसनगाव परिसरातील  बसेसच्या फेर्‍या अचानक रद्द केल्या जातात. याबाबत ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारी असल्याने आ. शिवेंद्रराजेंनी सातारा मध्यवर्ती बसस्थानकातील विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांच्या दालनात बैठक घेतली. यावेळी माजी जि.प. सदस्य राजू भोसले, विजय मोरे, वाहतूक नियंत्रक गणेश कोळी, विजय मोरे, यशवंत गंगावणे, आनंदा गायकवाड, अजय काशिद तसेच परळी, कास, ठोसेघर परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. 

आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सातारा एस.टी. महामंडळाचा मनमानी कारभार सुरू आहे. वारंवार समज देवूनही कारभारात सुधारणा होत नाही. या भागातील बसेस सहलीला का सोडल्या जातात? परळी-केळघणी, आसनगाव-कुसवडे, आरेदरे, ठोसेघर, चाळकेवाडी, चिखली-जांभे, लावंघर, काळोशी, पाटेघर-अलवडी, कास, बामणोली, तेटली या मार्गावरील बसेस अचानक रद्द केल्या जातात. 

ही गावे डोंगराळ आहेत. या गावांना एस.टी. बसेसशिवाय दुसरा पर्याय नाही. या परिसरात वडाप चालत नाही. असे असूनही या गावाकडे दुर्लक्ष का केले जाते? जुन्या बसेस पाठवल्या जातात. या रस्त्यात कुठेतरी बंद पडतात. त्या दुरूस्त होईपर्यंत संपूर्ण दिवस जातो.त्यामुळे विद्यार्थी, प्रवासी यांचे हाल होतात. एस.टी. महामंडळ प्रवाशाच्या सेवेसाठी आहे का पैसे कमवण्यासाठी? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. रस्ते चांगले असूनही बसेसच्या फेर्‍या अचानक रद्द केल्या जात आहेत. बसेस बंद पडत आहेत हे चुकीचे असल्याचे आ. शिवेंद्रराजे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी मला थोडा वेळ द्या. या गोष्टींमध्ये सुधारणा होईल. बसेसच्या फेर्‍या सुरळीत होतील, असे आश्‍वासन दिले.