Tue, Jul 23, 2019 02:28होमपेज › Satara › अय्यो, खरचं आहे हा ‘महामार्ग’!

अय्यो, खरचं आहे हा ‘महामार्ग’!

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 07 2018 8:54PMसातारा : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे. परंतु, सातारा ते पुणे या प्रवासात हा खरचं महामार्ग आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, निसरड्या साईडपट्ट्या, दुरूस्तीच्या प्रतीक्षेत असणारे संरक्षक कठडे, पुलावरील अयोग्य चढ-उतार यासह अनेक गोष्टींमुळे सातारा-पुणे प्रवास जीवघेणा ठरत आहे. त्यातच वाई आणि खंडाळा तालुक्यातून जो महामार्ग जातो तो ‘डेंजरझोन’ मध्ये गेला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सातारा जिल्ह्यात अपघात प्रवण क्षेत्र वाढत असल्याचे केंद्राला दिलेल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गावर मरण स्वस्त झाले की काय? असा प्रश्‍न पडू लागला आहे.

पुणे-सातारा दरम्यान सहापदरीकरण करण्याच्या कामाला 2006 मध्ये सुरूवात झाली होती. हे काम रिलायन्स कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने सब ठेकेदार नेमल्यामुळे कामात एकसंघपणा राहिला नाही. तसेच कामासाठी कंपनीनेच पैसा न घालता टोलच्या पैशातूनच कामे केली जाऊ लागली. त्यामुळे तब्बल 12 वर्षे झाल्यानंतरही महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम झालेले नाही. उलट अनेक ठिकाणी दुरूस्तीची कामे झाल्याने सातारा-पुणे प्रवासातील 70 पैकी 25 ते 40 किलोमीटरचा प्रवास घातक बनला आहे. घातक प्रवासाची सुरूवातच मुळात लिंब खिंडीतून होते. या ठिकाणी पूल अरूंद असल्याने व दोनच लेन असल्याने सुसाट जाणरी वाहने नियंत्रित न झाल्यास अपघात होतात.

तर पाचवड व भुईंज परिसरात याहून वाईट परिस्थिती आहे. कृष्णा नदी पुलावर रस्त्याची इतकी वाईट अवस्था झाली आहे की यावरून वाहने चालवणे म्हणजे कसरत करावी लागत आहे. चार चाकी वाहनेही या ठिकाणी आदळत असल्याने नेमकी गाडी कशी चालवावी, हेच चालकांना समजेनासे झाले आहे. तर दुचाकी चालकांना स्वत:चा तोल आवरता आवरता नाकी नऊ येत आहे. भुईंज बसस्थानक व परिसरातही खड्ड्यांची रास दिसून येत आहे. भुईंजपासून थोडे अंतरावर बदेवाडी हे गाव आहे या ठिकाणी महामार्गाचे योग्य सपाटीकरण न झाल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. मोठ मोठी वाहने या ठिकाणी आदळत असल्याने गाडी पलटी होण्याची भीती चालकांच्या मनात राहते. तर सुरूर पुल काहीच दिवसांपूर्वी खचला होता. या पुलावरूनही जाताना वाहने आदळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 

अपघातासाठी खंबाटकी घाट कुप्रसिध्द आहे. या ठिकाणी शेकडो अपघातामध्ये हजारो जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर अनेक जण जायबंदी झाले आहेत. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काहीच कृती केलेली दिसत नाही. या घाटातीलच ‘एस’ कॉर्नरवर काही महिन्यांपूर्वी ट्रक पलटी होऊन 17 जणांचा मृत्यू झाला होता. एवढी भीषण घटना घडल्यानंतर प्राधिकरणाकडून या ठिकाणी फक्‍त रबिंग करण्यात आले होते. तेही आता कमी होत गेल्याने वाहनांचा वेग कमीच होत नाही. तर काही ठिकाणी सिमेंट काँक्रीटच्या 3 ते 4 फुटांच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत. याचाही फारसा काही उपयोग होताना दिसत नाही. 

शिरवळ पासून काही अंतरावर पुढे गेल्यावर एका दुभाजकाजवळ ओबडधोबड खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकी स्वारांना धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी भरावही टाकण्यात न आल्याने चालक थेट मोठया वाहनांच्या चाकाखाली येत आहेत. त्यापुढे 2 किलोमीटर अंतरावर सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. गेल्या 2 वर्षांपासून हे काम सुरू आहे. कुर्मगतीने काम होत नसल्याने काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. याच ठिकाणी एक शिवकालीन मंदिर असून या मंदिराचे पुनर्वसन न केल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्याच ठिकाणी एक मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याच ठिकाणी कोणताही सुरक्षा कठडा नाही, याशिवाय येथील रस्ताही सततच्या चिखलाने निसरडा झाला आहे. पुण्याहून सातार्‍याच्या बाजूने लागणार्‍या खंबाटकी घाटात रस्ता रूंद करण्यात आला आहे. परंतु, अनेक ठिकाणी 

तांत्रिक चुका झाल्याने वाहनांना घाट चढताना नाकी नऊ येतात. एका तर कॉर्नरला खड्डे पडल्याने लेन बंद केली आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी लावलेले ड्रम न दिसल्याने एखाद्याचा जीवही जाऊ शकतो.