Mon, Mar 25, 2019 17:25होमपेज › Satara › पुढारीच्या स्टिंग ऑपरेशनमुळे राज्यात खळबळ

पुढारीच्या स्टिंग ऑपरेशनमुळे राज्यात खळबळ

Published On: Jan 22 2018 9:07PM | Last Updated: Jan 23 2018 1:12AMसातारा : प्रतिनिधी

दैनिक पुढारीने स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणलेल्या सिव्हीलच्या प्रिझन वॉर्डमधील संशयित आरोपींच्या लुंगी डान्स प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी घेतली असून, याप्रकरणी पोलिसांच्या वतीने जिल्हा न्यायालयात सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे. घटनेवेळी ड्युटीवर हजर असणार्‍या चार पोलिसांचीही चौकशी सुरु केल्याची माहिती संदीप पाटील यांनी दिली. दरम्यान, सातारा पोलिसांनी प्रिझन वॉर्डची झाडाझडती घेतली असता मोबाईल, कॅरम सापडल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

आनेवाडी टोल नाक्यावरुन झालेल्या सुरुचि राडा प्रकरणात खासदार व आमदार गटातील कार्यकर्ते न्यायालयीन कोठडीत. यातील काही संशयित  प्रकृती अस्वस्थ्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. शनिवारी आमदार गटातील कार्यकर्त्यांना जामीन झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असणार्‍या संशयितांच्या आनंदाला पारावर उरला नाही. यातूनच अतिउत्साही संशयित आरोपींनी चक्क प्रिझन वॉर्डचाच डान्स बार करत लुंगी डान्सवर ताल धरला.

प्रिझन वॉर्डबाहेर पोलिसांचा बंदोबस्त असतानाही आतमध्ये संशयितांचा लुंगी डान्स झाला. दैनिक पुढारीने स्टींग ऑपरेशनद्वारे या लुंगी डान्सचे वृत्त व्हिडीओ क्लिपसह  समोर आणले. या घटनेने पोलिस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली. बिहार, उत्तरप्रदेशच्या धर्तीवर प्रिझन वॉर्डमध्येच संशयित आरोपी मोबाईल वापरतात व बिनधोकपणे डान्स करत असल्याचे ‘पुढारी’ने व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये समोर आले. प्रकृती अस्वस्थ असणारे संशयित रूग्ण धमाल मूडमध्ये कसे काय नाचतात? असा सवाल उपस्थित झाला. ‘पुढारी’ने याबाबत केलेल्या स्टींग ऑपरेशनची जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी गंभीर दखल घेतली. तातडीने याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. त्यानुसार रविवारी रात्री पोलिसांच्या एका पथकाने प्रिझन वॉर्डमध्ये झाडाझडती घेतली.  त्यावेळी 2 मोबाईल, पॉवर बँक, कॅरम व सिगारेटची पाकिटे सापडली. या घटनेमुळे पोलिसही हादरुन गेले. घटनास्थळाचा पंचनामा करुन त्या वस्तू जप्त करण्यात आल्या.

पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांना या सर्व प्रकरणाचा सविस्तर अहवाल तयार करण्यास सांगून तो जिल्हा न्यायालयात सादर करण्याचे आदेशही पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत. तसेच प्रिझन वॉर्डच्या बंदोबस्तासाठी 1 पोलिस हवालदार व 3 पोलिस कर्मचारी तैनात होते. त्यांचीही चौकशी करण्यास सांगितले असून यामध्ये दोषी पोलिसांवर लवकरच कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, सोमवारी दिवसभर सातारासह जिल्ह्यात व राज्यात लुंगी डान्सची चर्चा रंगली होती. याप्रकरणात आता पुढे कोणती कारवाई होणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरुची राडाप्रकरणी जामिन होण्यास सुरुवात झाली असताना सोमवारी याप्रकरणी काही संशयित आरोपींच्या जामीनावर सुनावणी होणार होती. मात्र सोमवारी याबाबत कोणताही निर्णय झाला नसून त्याबाबत मंगळवारी पुढील सुनावणी होणार आहे.

तुरुंग अधिकारी व सिव्हिल अधिकारी यांचे साटेलोटे
गुन्हेगाराला अटक झाली की तो तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कसा जातो? त्याच्या अचानक छातीत कसे काय दुखते? किंवा जुने पुराने सगळे आजार अचानक कसे बाहेर येतात? याबाबतचे मजेदार किस्से या प्रकरणाने उघडकीस येत आहेत. तुरूंग अधिकारी व सिव्हिलमधील अधिकार्‍यांची साखळीच अशा गुन्हेगारांच्या मदतीसाठी काम करत असल्याचे समोर येत आहे. सुरूचि राडा प्रकरणानंतर संशयित आरोपी सिव्हिलमध्ये होते. सातारा शांत राहण्याच्या दृष्टीने या प्रकाराकडे कानाडोळा केला गेला. मात्र, जामीन सुरू होताच ज्या पद्धतीने नाच सुरू झाला व अतिउत्साहात आपण आजारी म्हणून आपणाला ही सूट देण्यात आली आहे. हेच संशयित विसरले. त्यातच बंदोबस्तावरील पोलिस हे केवळ बघ्याचे काम करत राहिल्याने आतला नाच कुणालाच दिसला नाही तो नाचणार्ऱ्यांनीच बाहेर आणला आणि स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी आतल्यांना सहकार्य केले तेही आता चौकशीच्या फेर्‍यात अडकणार आहेत.