Mon, Jun 24, 2019 17:12होमपेज › Satara › सातारा : प्रिझन वॉर्डमधील संशयित पळाला

सातारा : प्रिझन वॉर्डमधील संशयित पळाला

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 20 2018 11:40PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमधील संशयित आरोपी विश्रुत नवाते हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मंगळवारी पळाला. या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. गेल्याच महिन्यात लुंगी डान्सवरून गहजब निर्माण झाला असताना मंगळवारी दुपारी पुन्हा ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. दरम्यान, पळून गेलेल्या संशयित आरोपीवर सातारा, सांगली, रत्नागिरीसह ठिकठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, विश्रुत नवाते याला सुमारे दोन महिन्यांपूर्वी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली होती. संशयिताने चेकद्वारे (धनादेश) एलईडी, टीव्ही, फ्रीज यासह विविध वस्तू घेतल्या होत्या. चेकद्वारे वस्तू घेतल्यानंतर त्याच्या खात्यामध्ये पैसे नसल्याने फसवणुकीचे प्रकार घडकीस आले होते. कोरेगाव येथील एकाने त्याच्याविरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर एलसीबीही या घटनेचा तपास करत होते.

संशयित आरोपी विश्रुत नवाते हा पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिस तपासाला सुरुवात झाल्यानंतर नवाते याची कुंडली पाहून पोलिसही थक्‍क झाले. संशयिताने सातारा, सांगली, पुणे व रत्नागिरी येथे फसवणुकीचे प्रकार केल्याचे समोर आले. तो अलिशान वस्तू घेवून संबंधित शोरुमला चेक देत होता. वस्तू घेवून गेल्यानंतर त्या त्या शोरुम चालकांनी धनादेश वटवण्यासाठी चेक बँकेत जमा केले. मात्र संशयिताच्या खात्यामध्ये पैसेच नसल्याचे व फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

पोलिस तपासामध्ये एकामागून एक अशा घटना समोर आल्या.त्याच्या घरामध्ये छापा टाकल्यानंतर तेथून सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी अटकेची कारवाई केल्यानंतर पुढे त्याला  न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयीन कोठडीत असतानाच प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. त्याला रुग्णालयीन वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासल्यानंतर त्याची तब्येत ठीक झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटात पोलिसांची नजर चुकवून संशयित पसार झाला.

संशयित आरोपी पोलिसांच्या ताफ्यातून निसटल्याचा थरार समजताच एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी तत्काळ सिव्हीलमधील प्रिझन वॉर्डला भेट दिली. संशयित आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके तयार करुन पाठवण्यात आली. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत संशयित आरोपी विश्रुत नवाते हा पोलिसांना सापडलेला नव्हता.

लुंगी डान्सनंतरही पोलिसांनी बोध घेतला नाहीच...

सुरुचि राडा प्रकरणातील संशयितांची प्रिझन वॉर्डमधील लुंगी डान्सची क्‍लीप सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर संशयितांना कोणता आजार झाला आहे? असा प्रश्‍न उपस्थित झाला. याच दरम्यान, पोलिसांनी प्रिझन वॉर्डमध्ये छापा टाकल्यानंतर त्यांना वॉर्डमध्ये मोबाईल, कॅरम, चार्जर आदी वस्तू वापरत संशयित वापरत असल्याचे दिसून आले. पोलिस अधीक्षकांनी याप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करून उर्वरितांच्या चौकशीचे आदेश दिले. लुंगी डान्सने कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असतानाच अवघ्या एका महिन्यात याच प्रिझन वॉर्डमधील संशयित आरोपी पळून गेल्याने पोलिसांनी लुंगी डान्स प्रकरणाचा बोध घेतला नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.