Tue, Apr 23, 2019 21:37होमपेज › Satara › सातारा सीओंनी खातेप्रमुखांना झापले

सातारा सीओंनी खातेप्रमुखांना झापले

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 24 2018 11:48PMसातारा : प्रतिनिधी

गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील लोकांना नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. याची गंभीर दखल घेत सातारचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी खातेप्रमुखांसह कर्मचार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली. प्रलंबित प्रकरणांचा महिनाअखेरपर्यंत निपटारा करुन कारभारात सुधारणा न करणार्‍यांची वेतवाढ रोखण्याचा इशारा गोरे यांनी दिला. 

सातारा विकास आघाडीत सुरु असलेल्या नाराजीनाट्यावर खा. उदयनराजे भोसले यांनी संबंधित नगसेवकांचे चांगलेच कान उपटले. त्यांना निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर मंगळवारी नगरपालिकेचे कार्यालय नगरसेवकांची वर्दळ कमी झाल्याने ओस पडले. दोन-तीन पदाधिकारी आणि तेवढेच नगरसेवक सोडले तर साविआतील नगरसेवकांची उपस्थिती  रोडावलेली होती. जलमंदिरवर झालेल्या बैठकीचा नगरसेवकांनी धसका घेतला. त्याचे चांगले परिणाम  पालिकेत पहायला मिळाले. उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकार्‍यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. सभापती यशोधन नारकर तसेच श्रीकांत आंबेकर हेही आपापल्या दालनात तळ ठोकून होते. 

मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सकाळी 11 वाजता कमिटी हॉलमध्ये सर्व खातेप्रमुखांची बैठक बोलावली. त्यामध्ये पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, विद्युत विभाग, शहर नियोजन विभाग, स्थावर जिंदगी विभाग, अतिक्रमण हटाव विभाग,वसुली विभागातील प्रमुखांना बोलावले. सर्व विभागांकडे असलेली पेंडिंग प्रकरणे तातडीने काढावी. शहरात कचर्‍याची समस्या वाढू लागल्याने संंबंधित कर्मचारी मूळ ठिकाणी घेवून शहर स्वच्छतेची कामे हाती घ्या. दिलेल्या सुचनांचे पालन न करणार्‍यांवर निश्‍चित कारवाई केली जाईल. नियमांचे उल्‍लंघन करणारे आणि कामचुकार कर्मचार्‍यांची वेतनवाढ रोखली जाईल. अधिकारी असला तरी त्याच्यावर कारवाई होणार हे अटळ आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी तसेच संबंधित अधिकार्‍यांनी कामात हयगय न करता लोकांची गैरसोय टाळावी, अशी तंबीही मुख्याधिकार्‍यांनी दिली. बरेचजण कार्यालयात हजेरी लावल्यानंतर गायब होतात. कामाच्यावेळी सापडत नाहीत.  कोण कुठे असतो ते कळत नाही. कामानिमित्‍त बाहेर जाताना सांगितले जात नाही. त्यामुळे मुख्याधिकार्‍यांनी 1 ऑगस्टपासून बायोमेट्रिक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान,  सीओंच्या आक्रमकपणामुळे  कर्मचारी तसेच अधिकार्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले.