Tue, Apr 23, 2019 02:28होमपेज › Satara › सातारा पालिकेला मिळणार मध्यवर्ती कार्यालय

सातारा पालिकेला मिळणार मध्यवर्ती कार्यालय

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 11:28PMसातारा : प्रतिनिधी

सातारा विकास आघाडीच्या वतीने शहरात महत्त्वपूर्ण योजना हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेसमोर नवे प्रशासकीय कार्यालय साकारण्यासाठी सातारा नगरपालिकेने भूखंड ताब्यात घेण्याचा निर्णय शुक्रवारी सर्वसाधारण सभेत घेतला. भूखंडाचे लवकरच खरेदीखत करण्यात येणार आहे. सातारकरांच्या सुरक्षेच्यादृष्टीने संपूर्ण शहरातील चौकांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. भुयारी गटर योजनेच्या निविदांवरही सभागृहात चर्चा झाली. नविआने केलेला विरोध बाजूला करून बहुमताने सर्व विषय साविआने मंजूर केले.

सातारा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी सभागृहात नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नगराध्यक्षांच्या सहीविना बिले काढल्याने या प्रकरणावर विरोधी पक्षनेते अशोक मोने व नविआचे प्रतोद अमोल मोहिते यांनी मुख्याधिकार्‍यांकडे खुलासा करण्याची मागणी केली.  त्यावर बोलताना मुख्याधिकारी शंकर गोरे म्हणाले, या प्रकरणात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपात तथ्य नाही. बिले काढलेली कामे झालेली आहेत. त्याच्या नस्ती, व्हाऊचर उपलब्ध आहेत. अत्यावश्यक सेवा देताना तातडीची कामे केल्याने बिले काढली. याप्रकरणी प्रशासकीय कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. विषयपत्रिकेतील टिपण्यांवरून मोने, मोहिते यांनी सभा सचिवांना धारेवर धरले.

नियोजित  पालिका कार्यालयाच्या विषयावर अशोक मोने म्हणाले, पालिकेची सध्याच्या इमारतीची उंची वाढवून याठिकाणी कार्यालय बांधावे.  आरक्षित जागा असल्याने आवश्यक कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवला नाही. पालिकेला भूमिपूजनाची एवढी घाई का? असा सवाल केला. अ‍ॅड. डी. जी. बनकर म्हणाले, जि.प.समोर मोक्याच्या ठिकाणी असलेला 40 गुंठ्यांची 25 कोटींहून अधिक किमतीची जागा साविआचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यावरील प्रेमापोटी कल्याणी कुटुंबीयांनी दिली. सातारा शहराच्या भविष्याचा विचार करता त्याठिकाणी नगरपालिकेचे प्रशासकीय कार्यालय होणे आवश्यक आहे. या  भूखंडावर पालिकेचे नऊ मजली प्रशस्त कार्यालय बांधण्याचा साविआचा मानस आहे. महानगरपालिका झाल्यास ही इमारत फायदेशीर ठरणार आहे. वाढती लोकसंख्या, शहराचा विस्तार यासाठी पालिकेचे प्रशस्त कार्यालय असणे गरजेचे आहे. नविआने कितीही विरोध केला तरी लोकहिताचा विचार करूनच हा  विषय मंजूर केला जाणार आहे. 

भुयारी गटर योजनेसाठी निधी आहे का? या कामी किती तरतूद केली? अशीही विचारणा मोने यांनी केली. यावर अ‍ॅड. बनकर यांनी निधी उपलब्ध असल्याचे सांगितले.

कास तलावातून लगतच्या काही ग्रामपंचायतींना कनेक्शन देण्यावरूनही वादंग झाले. संंबंधित विषयाच्या टिपणीत पूर्वी झालेल्या कोर्ट प्रकरणाचा संदर्भ देऊन अधिकार्‍यांनी बदनामी केल्याचे सांगत नगरसेवक वसंत लेवे संतापले. त्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. दोन्ही योजनांना भरपूर पाणी असतानाही पाणी टंचाई भासत असल्याची तक्रार मोने, मोहिते, रवींद्र ढोणे, लीना गोरे  यांनी केली. भाजपचे गटनेते धनंजय जांभळे म्हणाले, पालिकेने पाणी कपात केल्यास नागरिकांमध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. दि. 24 रोजी मुख्यमंत्री सातार्‍यात असल्याने रस्त्यावरील खड्डे मुजवावेत. भाजप सरकारमुळे पालिकेला आतापर्यंत सर्वांधिक 350 कोटींहून अधिक निधी मिळाल्याचे सांगत जांभळेंनी शासनाच्या अभिनंदनाचा ठराव घेतला.