Tue, Apr 23, 2019 13:37होमपेज › Satara › सातारा पालिका बजेट सर्वसमावेशक 

सातारा पालिका बजेट सर्वसमावेशक 

Published On: Mar 01 2018 1:49AM | Last Updated: Feb 28 2018 10:55PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारत आहेत. नगरपालिकेने हाती घेतलेली कामे निधीअभावी रखडू नयेत, यासाठी निधीची ठोस तरतूद करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठीही अंदाजपत्रकाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

सातारा विकास आघाडीने यावर्षीच्या अंदाजपत्रकात विकासकामांसाठी ठोस तरतुदी करताना 228 कोटी 60 लाख 96 हजार 48 रुपयांचे बजेट सादर केले आहे.  कास धरण उंची वाढवणे, भुयारी गटर योजना, घनकचरा प्रकल्प निधी अभावी रखडू नयेत यासाठी बजेटमध्ये आवश्यक निधीची तरतूद केली आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी जशी खबरदारी घेतली आहे त्याचप्रमाणे विविध योजना राबवण्यावरही भर दिला आहे.

पर्यटन वाढीस चालना, शहराचा वाहतूक आराखडा, उद्याने विकसित करणे, अजिंक्यतारा स्मृती उद्यान व  पोहणे तलावाचे नूतनीकरण, सदरबझारमध्ये आयुर्वेदिक गार्डन, क्रीडांगणे विकसित करणे अशी अनेक कामे हाती घेण्यात येणार असल्याने त्यासाठी अंदाजपत्रकात निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. शहराच्या विकासाच्यादृष्टीने अनेक नाविण्यपूर्ण गोष्टींचा समावेश अंदाजपत्रकात करण्यात आला असला तरी हाती घेतलेले हे प्रकल्प तडीस नेण्याची जबाबदारी सातारा विकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांची आहे. सातारकरांच्या जिव्हाळ्याच्या अनेक विषयांचा समावेश बजेटमध्ये करण्यात आला आहेच. पण कोणत्याही कराचा बोजा नागरिकांवर न टाकल्याने सातारकरांना दिलासा मिळाला आहे.

अंदाजपत्रकाबाबत बोलताना मुख्याधिकारी शंकर गोरे म्हणाले, अंदाजपत्रकात केलेल्या तरतुदींशी संबंधित शासकीय परिपत्रक तसेच जीआर जोडणे बंधनकारक नाही. अंदाजपत्रकात उत्पन्न तसेच खर्चाच्या नोंदी दर्शवल्या असल्या तरी  31 मार्चनंतरच खरी आकडेवारी समोर येत असते, असे सांगितले. नगरपालिकेने घेतलेले कर्ज हप्त्याने फेडले जाते. अर्थसंकल्प सर्वसमावेश आहे. दिव्यांगांबरोबरच महिलांसाठी बजेटमध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार वंचित आणि शोषित घटकांसाठी पुरवणी अंदाजपत्रकात पुन्हा तरतूदही करता येईल, असेही गोरे यांनी सांगितले. 

लेखापाल विवेक जाधव म्हणाले,  सातार्‍यात हाती घेण्यात आलेल्या योजनांसाठी नगरपालिकेचा हिस्सा म्हणून तरतूद करण्यात आली. या अर्थसंकल्पावर स्थायी समितीने वेळोवेळी घेतलेल्या सभांमध्ये प्रत्येक बाबींवर विचार विनिमय करुन आवश्यक बदल करण्यात आले.